कधीतरी मनात खोलवर एखादी अढी बसलेली असते, आपल्याला जाणवतही नाही पण एखाद्या प्रसंगात ती उसळी मारुन वरती येते तेव्हा आपल्यालाच नवल वाटते. ॲनॅसिन बंद झाल्यावर दुकानदाराकडे त्याला पर्यायी गोळी कुठली विचारले तेव्हा त्याने सॅरिडॉन सजेस्ट केली आणि मनात खोलवर बसलेली अढी उसळी मारुन वरती आली. FY ला असताना आमच्या काणे सरांनी रोश विरुद्ध ॲडम्सच्या लढ्याची कथा वर्गात सांगतली होती, अजूनही सरांचा सांगताना झालेला लालबुंद चेहरा डोळ्यासमोर येतो. आता पिरॅमलची असलेली सॅरिडॉन कधीकाळी रोशची होती, त्यावेळी रोशबद्दल मनात बसलेली अढी अजून सॅरिडॉनला मनापासून नकार देते. अशा खुप गोष्टींबद्दल,माणसांबद्दल बसलेली अढी आपल्या माणसांपासून, आनंदापासून कायमची दूर ठेवते, लक्षातही न येता.