Skip to main content

Posts

Showing posts from August, 2023

असे वाटते.....

थोडेसे बोलावे असे वाटते तुटलेले जोडावे असे वाटते उगाच येतो अहंकार आडवा  मीपण सोडावे असे वाटते. पावसात ओघळावे असे वाटते पुन्हा फुलावे असे वाटते उगाच येतात दिवस वेंधळे मार्ग शोधावे असे वाटते. संवाद साधावा असे वाटते भाव जाणावे असे वाटते एकमेकांमधले अंतर तोडून हात मिळवावे असे वाटते. किती शिल्लक उन्हाळे असे हिवाळे जपावे असे वाटते, संपून गेला बहर तरीही आठवणीत रहावे असे वाटते. ---- अभय बापट

निर्णय

निर्णय चुकतात, चुकू द्यावे श्रेय हुकतात, हुकू द्यावे जगता जगता आयुष्याकडून जुगारातले दान घ्यावे. बंध सुटतात,सुटू द्यावे माणसं तुटतात, तुटू द्यावे जगता जगता नात्याकडून आपुलकीचे फुल घ्यावे. मार्ग चुकतात, चुकू द्यावे रस्ते सरतात, सरु द्यावे चालता चालता रस्त्याकडून सावलीचे दान घ्यावे. प्रश्न पडतात, पडू द्यावे उत्तरं चुकतात,चुकू द्यावे सोडवता सोडवता उत्तराकडून  ज्ञानाचे कण घ्यावे. ध्येय हुकतात, हुकू द्यावे अनुभव मुकतात, मुकू द्यावे जगता जगता अनुभवाकडून स्वत्वाचे भान घ्यावे. ------ अभय बापट ०५/०८/२०२३

शब्दशिवारातला शेतकरी

डोळे थकले आता पुन्हा एकदा येवून जा रानातल्या कविता शहरांमध्ये गाऊन जा. एकाकी माणसांना तुझे शब्द ऐकवून जा आजोळची गाणी शाळेमध्ये शिकवून जा. आंब्याच्या मोहराचा कोवळा सुवास गजबजलेल्या शहरात पाठीमागे ठेवून जा. गाभूळल्या चिंचेचा आंबटगोड घास चव विसरलेल्या जिभेला उ:शाप देऊन जा. तुमच्या मनामधला दयाघन माझ्या मनात रोवून जा साध्यासुध्या जगाचे गीत नव्याने गाऊन जा. ------ अभय बापट ०४/०८/२०२२