डोळे थकले आता
पुन्हा एकदा येवून जा
रानातल्या कविता
शहरांमध्ये गाऊन जा.
एकाकी माणसांना
तुझे शब्द ऐकवून जा
आजोळची गाणी
शाळेमध्ये शिकवून जा.
आंब्याच्या मोहराचा
कोवळा सुवास
गजबजलेल्या शहरात
पाठीमागे ठेवून जा.
गाभूळल्या चिंचेचा
आंबटगोड घास
चव विसरलेल्या जिभेला
उ:शाप देऊन जा.
तुमच्या मनामधला दयाघन
माझ्या मनात रोवून जा
साध्यासुध्या जगाचे
गीत नव्याने गाऊन जा.
------ अभय बापट
०४/०८/२०२२
Comments
Post a Comment