Skip to main content

Posts

Showing posts from August, 2025

खबरदारी

खुप थोड लिहिण्याआधी खुप काही खोडावे लागते वयात आलेल्या लेखणीलाही थोडे जपावे लागते. भावनाही झाल्या बेभान आता समाजासारख्या अश्रूंतून उतरण्याआधी त्यांना समजावावे लागते. रक्त आणि अश्रू ही नाही करत कोणाला हळवे हळवे होण्याआधी आजूबाजूला बघावे लागते. लोकं काय म्हणतील याची काळजी करत लोकांमधले एक होवून दुसऱ्यांना बोलावे लागते. आधारासाठी पुढे आलेला हात हाती घेण्याआधी पाठीमागे लावलेल्या झेंड्याला तपासावे लागते. माणसे झाली इथली माणुसकीला पारखी आता प्राण्यांमधल्या माणुसकीचे उदाहरण द्यावे लागते. -----अभय बापट

मैत्री

मैत्री म्हणजे ग्रीष्मातला गारवा, मैत्री म्हणजे शुष्क जीवनातला श्रावण सरवा. मैत्री म्हणजे  आयुष्यातील सुरेल गाणे, मैत्री म्हणजे  आपुलकीचे नाणे. मैत्री म्हणजे  अपुर्णतेतील पुर्णता मैत्री म्हणजे जीवनातील सुदृढता. मैत्री म्हणजे तू दिसत नसूनही असणे मैत्री म्हणजे अविरत आनंदाचा झरा वाहणे. मैत्री म्हणजे अंधारात उजेडाचे लेणे, मैत्री म्हणजे सुख, समाधान, आनंदाचे बरसणे. मैत्री म्हणजे रुसणे,फुगणे, रागावणे, मैत्री म्हणजे समजावणे, समजणे, सावरुन घेणे. --- अभय बापट ०३/०८/२०२३