खुप थोड लिहिण्याआधी खुप काही खोडावे लागते
वयात आलेल्या लेखणीलाही थोडे जपावे लागते.
भावनाही झाल्या बेभान आता समाजासारख्या
अश्रूंतून उतरण्याआधी त्यांना समजावावे लागते.
रक्त आणि अश्रू ही नाही करत कोणाला हळवे
हळवे होण्याआधी आजूबाजूला बघावे लागते.
लोकं काय म्हणतील याची काळजी करत
लोकांमधले एक होवून दुसऱ्यांना बोलावे लागते.
आधारासाठी पुढे आलेला हात हाती घेण्याआधी
पाठीमागे लावलेल्या झेंड्याला तपासावे लागते.
माणसे झाली इथली माणुसकीला पारखी आता
प्राण्यांमधल्या माणुसकीचे उदाहरण द्यावे लागते.
-----अभय बापट
Comments
Post a Comment