विफल आस......
तुझीया भेटीची धरूनिया आस
तुझ्या मंदिरास आले नाथा.
क्रमियेला मार्ग किती घाईघाई
उत्कंठा हृदयी तीव्र दाटे.
तुझ्या दर्शनाचा बघाया सोहळा
पंचप्राण गोळा झाले नेत्री.
श्रीमुख देखून संतुष्ट होईन
मस्तक ठेवीन पायांवरती.
घट्ट कवळून गोजिरी पाउले
आंसवांच्या जले न्हाणीन मी.
हृदयी दाटले अनन्त उमाळे
करीन मोकळे तुजपाशी.
याचासाठी माझा आसावला जीव
घेतली मी धांव तुजपाशी.
हाय परी तुझे बंद हे कवाड
दर्शनाच्या आड येई सख्या.
दूर हे व्हायचे कधी अन्तराय
कधी तुझे पाय लाभणार ?
स्वहस्तेंच देवा कवाड खोलून
देशील दर्शन कधी बरें ?
नको नको माझा अंत बघू आता
धांवून अनन्ता भेंटी देई.
--शांताबाई शेळके.
Comments
Post a Comment