Skip to main content

संकटसमयीं ईश्वराचा धावा

येक कथा स्मरली. आप्पांनी "मोगरा फुलला" मध्ये शब्दबद्ध करोन ठेवलेली.......
  " येक बापुडा अथांग डोही पोहायास उतरला.पाणी तुटेना,पार लागतां दिसेना.
  बुडतों ऐसें देखोन त्याणे देवतास्मरणास प्रारंभ केला. आगोदर मारुतीरायास सांकडें घातलें, कीं हनुमन्ता, तुजविणें या दुस्तरांतून कोण पार पाववील ? मारुतीरायांनें गाऱ्हाणें आइकलें, तो उठिला.गदा पेलिली.पुच्छ आवरिलें.आता तो निघणार, तो घाबरा झालेल्या त्या बापुड्यानें मारुतिरायास त्यागोन आदिमितेचे धांवणे केलें, कीं भगवती ! आता तुझीच आस. मारतिराया स्वस्थानी बैसला. आंबा पदर सांवरोन उठिली, तिणें आपल्या वाहनाचें स्मरण केलें. आयाळ सांभाळीत सिंह येवोन मातेपुढती उभा  राहातो, तोंवरी अंबेच्या कानीं विव्हल स्वर पडिला, की खण्डेराया,या निकर क्षणी त्वां तरी मज दिनास उद्धरावेंस ! आणि. खण्डेराय आपल्या अश्वावर बैसोन डोहाशीं जातो, तों त्यास केवळ बुडबुडे दिसले !"
  
  ये वाचोनी माझ्या मनी येक कथा स्फुरली......

  "कोणे एके काळी, जगता वरी येका व्हायरसची छाया पडली. येक बापुडा मनोमनी घाबरोन गेला, हवालदिल जाहला.त्याने होमिओपॅथीश्वराचा धावा चालू केला, बा हनिमाना, तूची आता आंसरा,मला वाचिंव. होमिओपॅथीश्वर हाती आर्सेनिकची कुपी घेवून, आपुल्या मेंढीच्या दुधापासून निर्मिलेल्या गोल यानात बसावयास निघाले.तोच कानीं स्वर आला.
  हे ॲलोपॅथीश्वरा ! राया धाव. तुजविणं कोण मज सुखरुप वाचविलं. ॲलोपॅथीश्वर, खुर्चितून उठला.रेमडेसिवीरची कुपी हाती घेतली. आपल्या सिरिंज नामें वाहनात बसणांर तो त्याच्या कांनी विव्हल स्वर पडिला.
  हे आयुर्वेदेश्वर धन्वंतरी धांव रे धांव ! या संकटसमयी तूच माझ्या हातीं धरोन मला सकुशल घेवोन जा. श्री धन्वतंरीं निघालें.  हाती कमंडलोत काढा घेतला. अश्विनी कुमारांना सोबत घेतलें.वायुवेगाने उपचार स्थलीं पोचलें. तो त्यांस केवल रिकामा बेड दृष्टींस पडला !"

Comments

Popular posts from this blog

विळखा

आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी  उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५

कोजागिरी

पौर्णिमेच्या चंद्र ज्योती, चंद्रिकेच्या दुग्ध धारा मंद गंधा वाहूनिया आणितो हा शीत वारा, रात्र ही साखलेली, चंद्र किरणी माखलेली शीत वारा सेवूनीया काया ही सुखावली, आपुलकी...

बाओबाब अलिबाग

माणसांची वृत्ती बदलली, विचार करण्याची  पद्धत बदलली. आजकाल नवीन झाड लावताना माणूस पहिल्यांदा विचार करतो आपल्याला त्याचा उपभोग घ्यायला मिळणार आहे का ?      एका छोट्याश्या अंकुरापासून भलामोठा वृक्ष बनायला शेकडो वर्ष लागतात.      हे आहे अलिबाग पोलिस लाईनमधले चोरचिंचचे/गोरखचिंचेचे/ बाओबाबचे झाड.      शरदिनी डहाणूकर झाडांना सोयरेआप्त म्हणतात आणि गोरखचिंचेचा उल्लेख आपले पुर्वज असा करतात.       पोलिस परेड ग्राऊंड शेजारी असलेला हा महावृक्ष शेकडो वर्ष वयाचा असावा. पोलिस परेड ग्राऊंडवरची छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा बघून या वृक्षाला महाराजांची आठवण येत असेल का ?कदाचित त्याने त्याच्या तरुणपणी महाराजांना बघितलेही असेल.        सरखेल कान्होजी आंग्रे यांनाही त्याने नक्कीच बघितले असेल.         त्याचा ही ऊर भरुन येत असेल परेड ग्राऊंडवरची तटबंदीची प्रतिकृती बघून, समोर महाराजांना बघून. तो ही हरवून जात असेल इतिहासाच्या रम्य स्मृतीत. ----अभय बापट ११/०६/२०२४