खावं काही पळवून पातेलीतलं की रहावं उपाशी हा एकच सवाल आहे. ह्या घराच्या वळचणीला उरलेला पोळीचा तुकडा खावून जगाव बेशरम लाचार आनंदान ?
की थैमान घालावं म्याव म्याव करुन स्वत:च्या हक्कासाठी
आणि करावा शेवट या लादलेल्या उपासाचा.
माझ्या तुझ्या ह्याच्या अन त्याच्याही.
पोटात चुकचुकणाऱ्या उंदाराने भुकेला असा डंख मारावा…
की नंतर मिळणाऱ्या सुखनिद्रेला नसावा किनारा कधीही..
पण मग..
पण मग त्या
निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडु लागलं तर….? गळ्यात बांधलेल्या घंटेचे तर…तर…
इथेच मेख आहे.भुकेच्या भयंकर डोहात अपेक्षेने तोंड घालण्याचा
धीर होत नाही म्हणुन आम्ही सहन करतो रात्रीची निरव शांतता आसमंतात हात पसरुन काळोखाला आपल्या कवेत घेण्याची.
सहन करतो लबाड साधूसारखे डोळे मिटून वाट बघण्याची तपश्चर्या आमच्या अमाप उत्साहाला कुंपण पडत असले तरी...
अखेर तोंडाचा कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या मानेन आमच्याच दादाच्या पायाशी.
विधात्या.. तु इतका कठोर का झालास?
एका बाजुला आम्ही ज्यांना जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुस-या बाजुला ज्याने आम्हाला आधार दिला ते ही आम्हाला वाट पहायला लावतात छोट्या ताईच्या शाळेतून येण्याची.
आम्ही कोणाच्या पायावर अंग घासायचं, लाडात येवून? कोणाच्या पायाशी गुरगुरत बसायचं अपेक्षेने?
कोणाच्या ? कोणाच्या???
बोके सम्राट
---अभय बापट
२२/०७/२०२५
Comments
Post a Comment