निरर्थकाची डायरी
अधांतरी....
काल आदित्यची बातमी ऐकली, तात्या अभ्यंकरांनी कधीकाळी आम्हाला एका ग्रुपवर ॲड केलं तेव्हापासूनची ओळख. त्याची वक्तृत्व स्पर्धेतील बक्षीसं, त्याची जर्लनालिस्ट होण्याची आणि त्यासाठी डिप्लोमा करण्याची धडपड. चिपळूणमध्ये सुरु केलेलं हॉटेल. उभं रहाण्यासाठी सुरु असलेली झुंज. काल नियतीने करार मोडला आणि ही झुंज एकाएकी एकांगी संपली.
काल समजलं आणि मन सुन्न झालं. पुनर्जन्म असेल तर तो अपुरी स्वप्न डोळ्यात घेवून पुन्हा येईलच. पण काल पहिला विचार आला तो त्याच्या होणाऱ्या बायकोचा,तीची गेली कित्येक महिने बघितलेली स्वप्न डोळ्यातच गोठली,त्या स्वप्नांचा आधारच खचून गेला.
असंच असतं आपण बघितलेली स्वप्न ही आपली स्वत:ची असली तरी आजूबाजूच्या लोकांच्या भक्कम आधारावरती अवलंबून असतात. मैत्री, प्रेम, जीवन, स्वप्न, स्वातंत्र्य भक्कम आधारावर असेल तरच अर्थपुर्ण.
एकाकी अधांतरी लटकणाऱ्या गोष्टी कितीही सत्य,शिव आणि सुंदर असल्यातरी निरर्थकच, परिस्थितीच्या फटकाऱ्यांनी हेलकावे खाणाऱ्या,अगदी नक्षत्रांची छत्री म्हणून गौरवल्या गेलेल्या या तगरीच्या फुलासारख्या.
Comments
Post a Comment