झाडाला नव्याने येणारा धुमारा योग्य वेळी खुडून टाकला तर ते झाडासाठी पोषक ठरते पण योग्य संधी साधून परत परत धुमारा खुडून टाकला तर ते झाड मरुन जाते.
वसंत येतो तो सगळ्यांसाठीच पण नव्याने गुढ्या उभारुन त्याचे स्वागत करायचे कि नाही हे प्रत्येकाच्या हातात असते.
झाडांकडे जो जो बघवे तर त्यातही माणूस दिसू लागतो. काही माणसं असतात पिंपळाच्या झाडासारखी एकटीच सळसळत राहणारी. काही असतात कोकणच्या राजा सारखी ऋतू बदलला की आनंदाने डोलत झिंमा खेळणारी. काही वटवृक्षासारखी स्थिर अविचल,खंबिरपणे पाय रोवून उभी राहणारी, उन,वारा, पाऊस स्वत:ची छाया वाटत राहणारी. काही सावरी सारखी सगळे वाटून टाकून नव्याच्या स्वागताला नव्याने उभी राहणारी.
काही स्वत:च स्वतः चे बोन्साय करुन घेतात, आपल्या मुळांना लगाम घालून,हातांना पसरण्यासपासून रोखत.
तशी माणसंही चालती बोलती झाडंच, फक्त देवाने त्यांना एक वरदान दिले आहे, आपण कोण बनायचे हे निवडण्याचे स्वातंत्र्य, कल्पवृक्ष बनायचे कि बाभूळ हे निवडण्याची संधी.
Comments
Post a Comment