आता गवत नुसतेच हिरवे दिसते आकाश नुसतेच दिसते निळे सोनेरी कवडशाच्या अंगावरती नसतात प्राजक्ताची फुले. ढग नुसतेच काळेभोरं त्यावर सदा बिजलीची कोर ऊन पावसाच्या खेळांमध्ये कुठे नाचतो इंद्रधनुष्यी मोर. कुठे दिसतात झाडांवरती फुलपाखरांचे बिलोरी पंख, मोबाईलमध्ये लपलेले डसतास विंचवाचे डंख. आता पुस्तकाची पानं नुसतीच फरफरतात, स्वरावीना गाणी कागदावरतीच सुकून जातात. निसर्गही एकटा एकटा फुलतो आणि सुकून जातो, आपल्या कोशामध्ये शिरुन नदीचे गाणे गातो. नदी एकटीच उफाळून सागराकडे धावत जाते, सर्व काही घडत असताना आजकाल कोण पहाते. प्रत्येकजण आपल्यामध्ये आपल्यासाठी जगत राहतो, स्वत:च्या स्तुतीत मग्न स्वत:लाच फुलं वाहतो.