चंबूगबाळ आवरावं म्हणतो
माणसांंना विसारावं म्हणतो
सावरणाऱ्या पुस्तकांंना
समर्थ हाती सोपवावं म्हणतो.
थोडसं झुकावं म्हणतो
ओझ उतरावं म्हणतो
आपुलकीच्या धाग्यांंना
निगुतीने सोडवावं म्हणतो.
स्वप्न सोडावं म्हणतो
रस्ता बदलावा म्हणतो
शेवटच्या मार्गावर
एकट्याने चालावं म्हणतो.
आठवणीतल्या शब्दांना
आतातरी जागावं म्हणतो,
पुस्तकातल्या गोष्टींमधलं
जग बघावं म्हणतो.
कोणजाणे कसा असेल
खडतर मार्ग काळोखाचा
उजेडासाठी एकट्याने
एकटंच जळावं म्हणतो.
सोप्पं नसतं बोलण्याइतकं
वागणं जगावेगळं
संपण्यापूर्वी पुन्हा एकदा
नव्याने तेवावं म्हणतो.
शब्दांनी जोडावं म्हणतो
मार्दव्यानं वागावं म्हणतो,
मराठी बाणा सोडून
माणसासारखं जगावं म्हणतो
----अभय बापट
२५/०४/२०२३
Comments
Post a Comment