सुंदर शब्दांचे तोरण
लागले आपल्या दाराशी
जणू सजते डोईवर
कोर बीजेची आकाशी.
प्राजक्ताच्या पावलांनी
सुख अंगणात येते,
सुंदर साजीऱ्या शब्दांनी
मनी रोमांच उठते.
शब्द शब्द उमाळ्याचे
आपले करती रंजन
जणू आईच्या हास्यातून
उब देते निरांजन.
सुख सावलीची आहे
तुमच्या शब्दांना झालर,
जणू तुमच्या बोटांमध्ये
आहे शारदेचा वावर.
अमृताचा अनुभव
यावा पुन्हा ओठाशी
शब्दा शब्दातून उगवावी
कोर बीजेची आकाशी.
जरा ओजस्वी तेजस्वी
झळाळी शब्दांना लाभावी
आणी तुमच्या कवनांनी
जगण्याला दिशा द्यावी.
----- अभय बापट
२७/१०/२०२५
Comments
Post a Comment