दंडवते आज्जी :- भयंकरणी तू मला विसरलीस फॉरीनला गेल्यावर पण तुझा छोटा दादा नाही विसरला बरं का, आजही तुझा नाही पण त्याचा मेसेज आला हो शुभेच्छा द्यायला.
अ भयंकर काकू :- काय उपयोग त्या फॉरवर्डेड मेसेजचा,मनापासून लिहीलेले दोन शब्द जास्त आनंद देतात त्या पेक्षा. हे फॉरवर्डेड मेसेज पाठवून नाती जपणं म्हणजे दुसर्याच्या जागेत कृत्रिम झाडं लावून ऋतू बदलण्याची वाट बघण्यासारखंच.
दंडवते आज्जी :- अगो, सगळ्यांनाच नाही जमत मनातले विचार शब्दात मांडायला. ऋतू वरुन आठवले, मराठीमध्ये कितीतरी मोठमोठे लेखक होवून गेले. दुर्गा भागवत,शरदिनी डहाळूकर आणि आणखी दोनचारजणं सोडता कितीजणांनी सृष्टीला भरभरुन देणाऱ्या ऋतूंना शब्दबद्ध केले आपल्या लेखणीतून.
अ भयंकर काकू :- हे काय मधेच ऋतूंचे आणलेत तुम्ही कुंचकानीकुंचका.
दंडवते आज्जी :- स्त्री ही ऋतूं सारखीच असते.निसर्गातले ऋतू बदलतात आणि निसर्गांचा रंग बदलून जातो, प्रत्येक बदलत्या ऋतूबरोबर निसर्गसृष्टी समृद्ध होत जातो.
माणसांच्या आयुष्यात वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यात स्त्रीही वेगवेगळे ऋतूरंग घेवून, वेगवेगळ्या रुपात येते,भरभरुन देते, आयुष्य समृद्ध करते आणि तरीही नेहमीच्या सवयीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष व्हावे त्याप्रमाणे त्यांचे अस्तित्व दुर्लक्षितच राहते, मग असा एक दिवस शोधून साजरा करावा लागतो.
अ भयंकर काकू :- तुम्ही पण लेखिका झालात की आजी
दंडवते आज्जी :- हे मी पण फॉरवर्डssच करतेय हो बोलून, तुझ्या त्या चहाटळ नातवाने मला पाठवले ते मी इथे बोलतेय,तुझ्याच भाषेत बोलायचे तर, त्याने तुझ्यासाठी लावलेली ही कुंडी तुझ्या दारात ठेवून मी आपल्या नात्याचा ऋतू बदलण्याची वाट बघतेय.
माझ्याकडून आणि तुझ्या नातवाकडून तुला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.
Comments
Post a Comment