माझा आवडता लेखक..... खरंच असा एकच एक लेखक येईल सांगता. वाचनाची सुरवात झाली ती चांदोबा आणि अमृतच्या आजोबांनी जपलेल्या अंकांपासून. गाडी पुढे सरकत जादूचे दिवे,उडत्या चटया हे स्टॉप घेत भा.रा.भागवतांच्या भुताळी जहाज, खजिन्याची बेटं असा खडतर मार्ग शोधत होती. शाळेतल्या बाई या सोबतच विज्ञान,इतिहास असे वेगवेगळे नवलाईचे प्रदेश दाखवत होत्या. कधीतरी सुशींच खजिना आणि मंत्रजागर ही पुस्तकं हाती लागली आणि सुशी नावाच्या बेटावर असंख्य दिवस नवलाईची इंद्रधनुष्य अनुभवली. पु.ल.देशपांडे, व.पु.काळे,द.मा.मिरासदार, द.पा.खांबेटे हे झुळझुळणारे झरे तहान भागवत होतेच. छोट्या गावातल्या छोट्या वाचनालयामुळे एकाच ठिकाणी अडकून राहणे शक्यच नव्हते. श्रिकांत सिनकर, बा.सि.अष्टिकर, व.कृ.जोशी हे गुन्हेगारीचे जग हाताला धरुन दाखवत होते तेव्हाच प्रमोद नवलकर रात्रीच्या मुंबईतील झगमगाट आणि दिवसाच्या झगमगीत मुंबईतील काळाकुट्ट अंधार अधोरेखीत करत होते. व्यंकेटेश माडगुळकर परवचा,सरवाच्या माध्यमातून स...