Skip to main content

मी ही वाचत सुटलो त्याची गोष्ट.

माझा आवडता लेखक.....
          खरंच असा एकच एक लेखक येईल सांगता. वाचनाची सुरवात झाली ती चांदोबा आणि अमृतच्या आजोबांनी जपलेल्या अंकांपासून. गाडी पुढे सरकत जादूचे दिवे,उडत्या चटया हे स्टॉप घेत भा.रा.भागवतांच्या भुताळी जहाज, खजिन्याची बेटं असा खडतर मार्ग शोधत होती. शाळेतल्या बाई या सोबतच विज्ञान,इतिहास असे वेगवेगळे नवलाईचे प्रदेश दाखवत होत्या.
          कधीतरी सुशींच खजिना आणि मंत्रजागर ही पुस्तकं हाती लागली आणि सुशी नावाच्या बेटावर असंख्य दिवस नवलाईची इंद्रधनुष्य अनुभवली. पु.ल.देशपांडे, व.पु.काळे,द.मा.मिरासदार, द.पा.खांबेटे हे झुळझुळणारे झरे तहान भागवत होतेच.
          छोट्या गावातल्या छोट्या वाचनालयामुळे एकाच ठिकाणी अडकून राहणे शक्यच नव्हते. श्रिकांत सिनकर, बा.सि.अष्टिकर, व.कृ.जोशी हे गुन्हेगारीचे जग हाताला धरुन दाखवत होते तेव्हाच प्रमोद नवलकर रात्रीच्या मुंबईतील झगमगाट आणि दिवसाच्या झगमगीत मुंबईतील काळाकुट्ट अंधार अधोरेखीत करत होते.
          व्यंकेटेश माडगुळकर परवचा,सरवाच्या माध्यमातून साधंसुधं गाव,निसर्ग,जगणं दाखवत असतानाच. मारुती चितमपल्ली जंगलचे देण भरभरुन ओंजळीत देत होते,देत असतात.
          निरंजन घाटे तर आवडते लेखक जणू ज्ञान आणि विज्ञानाची पाणपोई उघडून बसलेले तृषार्तांना तृप्त करणारे लेखक. दुर्गा भागवत आपल्या संस्कृतीतील संचित समोर उघड करत होत्या. विजय देवधर,बाळ भागवत, रविंद्र गुर्जर, लालू दुर्वे इंग्रजीतील वाङ्मय मराठीत आणून ते वेगळ जग आणि वेगळे अनुभव देतच असतात. अच्युत गोडबोलेंसारखे लेखक एकाच विषयाची समग्र माहीती देवून मराठी समृद्ध करतात.
         या प्रवासात असंख्य पाऊलवाटा भेटल्या कमुदिनी रांगणेकरांनी रुपांतरीत पुस्तके, कुसूम अभ्यंकर,सुमती क्षेत्रमाडे सारख्या कौटुंबिक कथा लेखिका.रविंद्र पिंगेंसारखे व्यक्तीचित्रणं,स्थळवर्णंन लिहीणारे. मिनी प्रभू, पुलं,गंगाधर गाडगिळ,रमेश मंत्री, सुभाष भेंडे, यांची प्रवासवर्णने.
रमेश मंत्रींचा जनू बांडे, गंगाधर गाडगिळांचे बंडू-स्नेहलाता.
कणेकरांची कणेकरी शैली. अनिल अवचटांचे वेगवेगळे अनुभव,पुभांची  प्रथम पुरुषी ऐकवचनी तेजस्वी देश आणि धर्मभक्ती. अत्र्यांनी पाजलेले कऱ्हेचे पाणी, त्यांचा हजरजबाबी विनोद, बोचकारणारी भाषण. 
          एकवेळ कसर पुस्तकांचा फडशा पाडायला विसरेल एवढ वाचलं गेलयं, कधीकधी पुस्तकं धुंढाळताना चकवा ही मिळाला आणि एखादं वेगळचं जग समोर उभं करणारे लेखकही भेटले.
         यासर्वांनी जो आनंद दिला तो शब्दात मांडताच येणार नाही.
         एकाचेच नावं घ्यायचे तर ते कोणाचे हे कधीही न सुटणारे गणितच.
सध्या काय वाचतोय-

प्रारंभ- गंगाधर गाडगीळ.... हा कथा आहे मुंबईच्या जडणघडणीत महत्वाची भुमिका पार पाडणारे जगन्नाथ शंकरशेट यांची तेवढीच ही कथा नव्या युगाकडे वाटचाल करणार्या मुंबईच्या प्रारंभाची.


Comments

Popular posts from this blog

विळखा

आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी  उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५

कोजागिरी

पौर्णिमेच्या चंद्र ज्योती, चंद्रिकेच्या दुग्ध धारा मंद गंधा वाहूनिया आणितो हा शीत वारा, रात्र ही साखलेली, चंद्र किरणी माखलेली शीत वारा सेवूनीया काया ही सुखावली, आपुलकी...

बाओबाब अलिबाग

माणसांची वृत्ती बदलली, विचार करण्याची  पद्धत बदलली. आजकाल नवीन झाड लावताना माणूस पहिल्यांदा विचार करतो आपल्याला त्याचा उपभोग घ्यायला मिळणार आहे का ?      एका छोट्याश्या अंकुरापासून भलामोठा वृक्ष बनायला शेकडो वर्ष लागतात.      हे आहे अलिबाग पोलिस लाईनमधले चोरचिंचचे/गोरखचिंचेचे/ बाओबाबचे झाड.      शरदिनी डहाणूकर झाडांना सोयरेआप्त म्हणतात आणि गोरखचिंचेचा उल्लेख आपले पुर्वज असा करतात.       पोलिस परेड ग्राऊंड शेजारी असलेला हा महावृक्ष शेकडो वर्ष वयाचा असावा. पोलिस परेड ग्राऊंडवरची छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा बघून या वृक्षाला महाराजांची आठवण येत असेल का ?कदाचित त्याने त्याच्या तरुणपणी महाराजांना बघितलेही असेल.        सरखेल कान्होजी आंग्रे यांनाही त्याने नक्कीच बघितले असेल.         त्याचा ही ऊर भरुन येत असेल परेड ग्राऊंडवरची तटबंदीची प्रतिकृती बघून, समोर महाराजांना बघून. तो ही हरवून जात असेल इतिहासाच्या रम्य स्मृतीत. ----अभय बापट ११/०६/२०२४