पुन्हा एकदा सौंदर्यच विश्वात उरावे
पुन्हा एकदा ॐकाराने आसमंत भरावे
पुन्हा एकदा व्हावी सृजनाची रम्य पहाट
पुन्हा एकदा माणुसकीने जन्मा यावे.
पुन्हा एकदा वात्सल्य होवू दे साकार
पुन्हा एकदा प्रेमाची वाहू दे संततधार
पुन्हा एकदा माणसांनी गजबजू दे घरदार
पुन्हा एकदा समाधानाचा उठू दे हुंकार.
पुन्हा एकदा निसर्गाशी जळू दे नाळ
पुन्हा एकदा संस्कृतीचा घुमू दे टाळ
पुन्हा एकदा सामर्थ्याची जागू दे जाणीव
पुन्हा एकदा मुठीमध्ये भरु दे आभाळ.
पुन्हा एकदा स्वातंत्र्याची ओढ रुजावी
पुन्हा एकदा स्वत्वाची जाणीव जागी व्हावी.
पुन्हा एकदा मागावे ज्ञानेशाचे पसायदान.
पुन्हा एकदा नव्याने आयुष्याची सुरुवात व्हावी.
----- अभय बापट
३०/१२/२०२२
Comments
Post a Comment