थोडे मनाप्रमाणे वागून पाहीले मी
ओंजळीतले मोती फोडून पाहिले मी.
नाही भेटले सुखाचे सोबती कोणी इथे
नात्यांतले सोने माझ्या जोखून पाहीले मी.
गर्दी गारद्यांची एकटाच मीही पडलो
सोबत्यात रामशास्त्री शोधून पाहिले मी.
वारा सभोवताली भिरभिरुन गेला
थोडे शब्द सुमनांना उधळून पाहिले मी.
देशात लोकशाही, दिली होतीत ग्वाही
शब्दांत लोकशाही लिहून पाहीले मी.
नाही राम इथे, ना माणूसही मिळाला
जेव्हा मनाप्रमाणे जगून पाहिले मी.
इथे भय कशाचे कायद्याची दुहाई
जोडून हात 'अभय' मागून पाहिले मी.
---- अभय बापट
२२/०१/२०२३
Comments
Post a Comment