गझलेलाही शिर्षक द्यावे असे कधी वाटते
शब्दाशब्दांतून अर्थ शोधावे असे कधी वाटते.
साधेपणाचे वरदान असते गझलेमध्ये सदा
सौंदर्यालाही परिमाण द्यावे असे कधी वाटते.
सर सर धावत येते श्रावणधारे सारखी
गझलेमध्ये चिंब भिजावे असे कधी वाटते.
असते वृत्ती वेगवेगळी तुमच्या माझ्यापासून
मात्रे मात्रेने फुलवत न्यावे असे कधी वाटते.
नशेसारखी भिनत जाते रक्तामध्ये आपल्या
हात देवूनी उरी धरावे असे कधी वाटते.
माया ममता प्रेम जिव्हाळा तिच्यात वसते
आपुलकीने स्विकारावे असे कधी वाटते.
माझी गझल आणि कविता आठवणींचे लेणे
शब्द होवूनी तिच्या उरावे असे कधी वाटते.
न बोलताही गारुड करते मनामनावरती
गझलेसाठी शुभ चिंतावे असे कधी वाटते.
----- अभय बापट
११/०२/२०२३
Comments
Post a Comment