भाषा साधी मिठीचीच होती
ओठांतून त्याचे लिप्यंतर झाले.
कळले सारे मौनातील इशारे
डोळ्यांतून त्यांचे भाषांतर झाले.
कधी उमलली कळी शब्दांतून ती
ऋतू नसता फुलणे अवांतर झाले.
सरले चार दिसाचे शब्दांचे सोहळे
जणू मनाचे देहांतून देशांतर झाले.
उमटले मनावर खोल ठसे व्यथांचे
मनाशी भांडणे निरंतर झाले.
विनाकरण ठाकले अंतर दोघांमध्ये
का रस्ते आयुष्याचे समांतर झाले.
--------- अभय बापट
१३/०२/२०२३
Comments
Post a Comment