देवा तुझ्या नामाचा रे, सुगंध असा दरवळावा आणि माझ्या श्वासालाही, कस्तुरीचा भाव यावा डोईवरच्या ऊन्हालाही माया सावलीची यावी हातावरच्या घावाचीही फुले प्राजक्ताची व्हावी देवा तुझ्या नामाचा टिळा ललाटी लागावा आणि माझ्या श्वासालाही, कस्तुरीचा भाव यावा. देवा तुझ्या लेकरांचे शब्द मनी रुजवावे माझ्या मनामध्ये भाव तुकयाचे जागावे ज्ञानाशाच्या ओवीने मार्ग जगण्याचा दाखवावा आणि माझ्या श्वासालाही, कस्तुरीचा भाव यावा. देवा नाथांच्या भक्तीचे बाळकडू पाजावे रामदासांच्या शक्तीचे मर्म मला आकळावे मायेच्या ममतेने हात माझा हाती घ्यावा आणी माझ्या श्वासालाही, कस्तुरीचा भाव यावा. देवा मनीच्या लालसेला समाधानाची पडो मीठी कैवल्याच्या चांदण्याशी घडून याव्या भेटीगाठी तुझ्या माझ्यातला अंतराय दूर दूर सरावा आणी माझ्या श्वासालाही, कस्तुरीचा भाव यावा. विठू नामाच्या गजराचा ध्यास असा जडावा माझ्या कणाकणातून नाद चिपळीचा घुमावा. देवा तुझ्या नामाचा रे, सुगंध असा दरवळावा आणी माझ्या श्वासालाही कस्तुरीचा भाव यावा देवा तुझ्या नामाचा रे, सुगंध असा दरवळावा आणी माझ्या श्वासालाही, कस्तुरीचा भाव यावा ----अभय बापट ११/११/२०२५