Skip to main content

नाम महिमा

देवा तुझ्या नामाचा रे, सुगंध असा दरवळावा
आणि माझ्या श्वासालाही, कस्तुरीचा भाव यावा

डोईवरच्या ऊन्हालाही माया सावलीची यावी
हातावरच्या घावाचीही फुले प्राजक्ताची व्हावी
देवा तुझ्या नामाचा टिळा ललाटी लागावा
आणि माझ्या श्वासालाही, कस्तुरीचा भाव यावा.

देवा तुझ्या लेकरांचे शब्द मनी रुजवावे
 माझ्या मनामध्ये भाव तुकयाचे जागावे
ज्ञानाशाच्या ओवीने मार्ग जगण्याचा दाखवावा
आणि माझ्या श्वासालाही, कस्तुरीचा भाव यावा.

देवा नाथांच्या भक्तीचे बाळकडू पाजावे
रामदासांच्या शक्तीचे मर्म मला आकळावे
मायेच्या ममतेने हात माझा हाती घ्यावा
आणी माझ्या श्वासालाही, कस्तुरीचा भाव यावा.

देवा मनीच्या लालसेला समाधानाची पडो मीठी
कैवल्याच्या चांदण्याशी घडून याव्या भेटीगाठी
तुझ्या माझ्यातला अंतराय दूर दूर सरावा
आणी माझ्या श्वासालाही, कस्तुरीचा भाव यावा.

विठू नामाच्या गजराचा ध्यास असा जडावा
माझ्या कणाकणातून नाद चिपळीचा घुमावा.
देवा तुझ्या नामाचा रे, सुगंध असा दरवळावा
आणी माझ्या श्वासालाही कस्तुरीचा भाव यावा

देवा तुझ्या नामाचा रे, सुगंध असा दरवळावा
आणी माझ्या श्वासालाही, कस्तुरीचा भाव यावा



----अभय बापट
११/११/२०२५

Comments

Popular posts from this blog

विळखा

आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी  उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५

कोजागिरी

पौर्णिमेच्या चंद्र ज्योती, चंद्रिकेच्या दुग्ध धारा मंद गंधा वाहूनिया आणितो हा शीत वारा, रात्र ही साखलेली, चंद्र किरणी माखलेली शीत वारा सेवूनीया काया ही सुखावली, आपुलकी...

बाओबाब अलिबाग

माणसांची वृत्ती बदलली, विचार करण्याची  पद्धत बदलली. आजकाल नवीन झाड लावताना माणूस पहिल्यांदा विचार करतो आपल्याला त्याचा उपभोग घ्यायला मिळणार आहे का ?      एका छोट्याश्या अंकुरापासून भलामोठा वृक्ष बनायला शेकडो वर्ष लागतात.      हे आहे अलिबाग पोलिस लाईनमधले चोरचिंचचे/गोरखचिंचेचे/ बाओबाबचे झाड.      शरदिनी डहाणूकर झाडांना सोयरेआप्त म्हणतात आणि गोरखचिंचेचा उल्लेख आपले पुर्वज असा करतात.       पोलिस परेड ग्राऊंड शेजारी असलेला हा महावृक्ष शेकडो वर्ष वयाचा असावा. पोलिस परेड ग्राऊंडवरची छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा बघून या वृक्षाला महाराजांची आठवण येत असेल का ?कदाचित त्याने त्याच्या तरुणपणी महाराजांना बघितलेही असेल.        सरखेल कान्होजी आंग्रे यांनाही त्याने नक्कीच बघितले असेल.         त्याचा ही ऊर भरुन येत असेल परेड ग्राऊंडवरची तटबंदीची प्रतिकृती बघून, समोर महाराजांना बघून. तो ही हरवून जात असेल इतिहासाच्या रम्य स्मृतीत. ----अभय बापट ११/०६/२०२४