आणि मी मांजर झालो--- एक दिर्घ लघूकथा.
पहाटे साखरझोपेला दूर सारुन डोळे टक्क जागे झाले, सूर्य अजूनही धुक्याची दाट दुलई पांघरुन लोळत पडला होता.
पांघरुणात पडून रहावे अशी अनिवार इच्छा होत होती पण डोळ्यांची भुक भागल्याखेरीज ते आडवं होण्यासाठी तयारच होत नव्हते . शेवटी अंतरुणाला टाटा करुन अनिच्छेने बाहेर पडलो.
नव्या जगाच्या दारात जावून उभा राहीलो "तिळा तिळा दार उघड" सारखा नव्या जगाचा कुटमंत्र मनात उच्चारुन,तंत्रमार्गातली निवडक अंगुलीमुद्रा हवेत करुन मी नवीन जगाचे दार किलकिलेकरुन मी आत प्रवेश केला.
नेत्रसुखद दृष्य समोर साकार झाले," वो फुलोंकी रानी, बहारोंकी मलिका" डोळ्यांसमोर साकार झाली, आजूबाजूला नजर फिरवली सभोवताली निसर्गसौंदर्य ओसंडून वहात होते . पहिल्यांदा आपल्याच दृष्टीला पडले या आनंदात मी दृष्याला हळूवार हाताने स्पर्श केला पण दुर्दैव.... अनेकांनी रात्रभर जागून त्या दृष्याचा आनंद लुटला होता,त्यातच काही मनीमाऊ,शेपटीवाली गुबगुबीत आणि काही फक्त माऊ,घाऱ्याडोळ्यांचे लेणे लावून बागडताना दिसल्या. प्रत्येकजण त्यांच्या कौतुकात मग्न होते.
मनात एकच विचार आला,"आपण मांजर झालो तर ?"
मनात विचार आला आणि आठवण झाली,नव्याजगाती महर्षी, सांस्कृतिक राजधानीचे राजगुरु,नेहरु मैदान पिठाचे आचार्य बाकडेश्वर बापू यांचीच.
दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या पायाशी रुजू झालो.त्यांना माझी इच्छा सांगितली," ते म्हणाले काही हरकत नाही, मी तुला मांजर करीन,शंभर रुपये पडतील.
मी म्हणालो," गुरूदेव मी फक्त तुमचे मार्गदर्शन मिळवण्यासाठी आलो आहे."
गुरूदेव म्हणाले," कोणताही निर्णय घेण्यापुर्वी साधकबाधक चर्चा करण्याची माझी पद्धत तू विसरलास का ? आपल्याला अशा वेळी सर्व सहज साध्य वाटते पण त्याच्या आड खुप बाधा येतात,त्यांचे ज्ञान मी तूला प्रदान करणार आहे".
मी म्हणालो," मग मी रविवारी येवू का ?
गुरूदेव म्हणाले," मी तुझ्यासाठी एक छानसे चित्र निवडून ठेवतो,दहा रुपये अॅडव्हान्स दे आणि मी सांगतो ते शब्द टाईप करायची प्रॅक्टिस कर. ते शब्द "अय्या,"" ईश्श" हे शब्द टाईप करता आले पाहिजेत पण लक्षात ठेव यांचा वापर खुप कमी असला पाहिजे.
"हम्म" हा शब्द अत्यंत महत्वाचा हे लक्षात ठेव आणि "सखे" आणि "सख्यांनो" या शब्दांनी सुरवात होणारे प्रश्न लिहीण्याची तयारी करुन ये.
हे सर्व गुप्तपणे करायचे आहे लक्षात ठेव, या साठी स्वत:च्याच दोन व्हॉट्सअप नंबरचा वापर कर.
मी अत्यंत आदराने विचारले," गुरूदेव, प्रश्न कोणत्या विषयावर असावेत ?"
गुरुदेव :- हे बघ वत्सा, या नवीन जगात दोन प्रकारची माणसंच टिकाव धरु शकतात,लोकप्रियतेचे शिखर गाठू शकतात,एक म्हणजे अत्यंत गुणी बुद्धीवान लोकं किंवा बावळट लोकं, बुद्धीवान लोकांच्या निर्मितीचे सर्व हक्क हातात असले तरी बावळटपणाचे सोंग घेवून लोकप्रिय होणे सर्वसामान्यांना शक्य आहे,तू तेच कर अत्यंत बाळबोध,भाबडे प्रश्न बावळटपणाचा आव आणून निर्भिडपणे विचार.
रविवारी पुर्ण तयारीने,खिशात फक्त नव्वद रुपये घेवून गुरुदेवांसमोर हजर झालो,त्यांनी नव्वद रुपये खिशात सारले आणि एक गोंडस छोट्याशा मांजराचा फोटो माझ्या नंबरवर फॉरवर्ड केला.
मी त्यांना विचारले, गुरुदेव असले फोटो चोरबाजारातील गुगलशेटच्या दुकानात मोफत मिळतात.
गुरूदेव म्हणाले," गुगल शेटच्या दुकाना मोफत फोटो मिळतात पण त्याच बरोबर तिथे जासूस करमचंदचे भिंग ही मोफत मिळते,तू लगेच पकडला जाशील. मुद्दाम तुझ्यासाठी हा फोटो मी धावपळ करुन काढला आहे.
एक गोष्ट लक्षात ठेव या पुढे या फोटोला प्रोफाईल फोटो किंवा फोटो असे म्हटलेस तर लगेच पकडला जाशील. या फोटोचा उल्लेख," प्रो पिक " असा लाडीकपणे करायचा.
तुझे जूने सर्व फोटो,"ओन्ली मी" असे सेटींग करुन ठेव.कोणत्याही माणसांच्या,लोकेशनवर तू टॅग असशील तर तो टॅग काढून टाक,फक्त निसर्गाचे फोटो,फॉरवर्डेड विनोद आणि कविता लोकांना दिसल्या पाहिजेत बाकी सर्व हाईड कर.
आणखीन दोन गोष्टी लक्षात ठेव, मी दोन वाक्य सांगतो ती नोट्समध्ये सेव्ह करुन ठेव.
१) लाज कशी वाटत नाही ओळख नसतात इनबॉक्समध्ये घुसण्याची,आज *** जणांना बाहेरचा रस्ता दाखवला.
२) पुन्हा जर कोणी इनबॉक्समध्ये प्रो पिक किंवा मोबईल नंबर मागितला तर कोणतीही सूचना न देता त्याचा स्क्रिनशॉट टाकण्यात येईल.
जा वत्सा आता अकाऊंट वरचे नाव बदल आणि सर्वांच्या लाडाला तयार हो.
मी :- आशीर्वाद असू द्या गुरुदेव.
गुरुदेव:- आजकाल गणेश चतुर्थीच्या दिवशीच उत्तरपूजेच्या अक्षता मंत्रवून दिल्या जातात त्याच प्रमाणे यातून बाहेर पडण्याच्या युक्ती मी तुला सांगतो, "एकदम तडकाफडकी गायब होवू नको, कुठूनही बाहेर पडताना तो दरवाजा आपल्यासाठी पुर्ण बंद होणार नाही याची काळजी घ्यावी."
स्टडीसाठी काही दिवस फेसबुकपासून दूर होणार असे पोस्ट कर. मोठ्यांकडे एक्झामसाठी आशीर्वाद माग, बरोबरीच्यांकडे शुभेच्छा.
दोन दिवस गायब हो,असे दोन तीन वेळा कर.मग पोस्ट कर," तुमच्यापासून दूर राहणे वाटते तेवढे सोप्पे नाही,तुमची,तुमच्या प्रेमाची आठवण येते म्हणून आता निग्रहाने अकाऊंट डिएॅक्टिव्हेट करत आहे, पुन्हा भेटूच".
आणि मी मांजर झालो.
माझा रंग, गुबगुबीत अंग, एवढेच काय माझ्या मिशा, माझी गोंडस केसाळ शेपटी याचे पण कौतुक सुरु झाले.प्रेमाचे सर्व अविष्कार देवाने जणू माझ्यासाठीच निर्माण केले असावेत असे वाटावे अशी त्यांची उधळण सुरू झाली.
पण नवीन जगातील मांजरी माणसांचे सर्व गुण आत्मसात केलेल्या होत्या,माझे कौतुक,रुप बघून त्यांच्या पोटात दुखू लागले,गवत खायचे सोडून त्या माझ्यावरच फिस्कारु लागल्या. तरी खुपसे लबाड बोके माझ्या बाजूने लढत होते. मांजरी एकमेकींच्या कानात म्याव म्याव करु लागल्या.
काही गल्लीतूनतर माझी विनाकारण हकालपट्टी करण्यात आली. जून्या मांजरींनी जून्या मिशा झडलेल्या बोक्यांनाही कटात सामील करुन घेतले.
मी मनात म्हणालो," पुन्हा माणूस होण्याची वेळ झाली"
आणि मी पुन्हा माणूस झालो.
( विनोदाच्या पाठशाळेतील रमेश मंत्राचे पुनःपठण)
ता.क.-- कथा संपूर्णपणे स्वतंत्र असून,व्यक्तीविशेष, स्वभावविशेष, गुणविशेषात साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा.
Comments
Post a Comment