सोळावं वरीस धोक्याचं म्हटले जाते ते मुलीसाठी-स्त्री करीता खरे असेलही पण पुरुषांच्या आयुष्यातील धोक्याची वर्ष ही पन्नाशीच्या आसपासची.
त्यावेळी अजूबाजूची माणसं आपल्याला जगात गर्क असतात, पुरुषमाणुस कात टाकायला आलेल्या सापासारखा सुस्तावलेला असतो.
पाण्याअभावी सुकत चाललेल्या झाडांची मुळे जशी ओलाव्याच्या शोधात असतात तशा या व्यक्ती आपलकीच्या, मायेच्या शब्दाच्या शोधात असतात. पैशापेक्षा माणसाच्या साठवणुकीचे महत्व कळते ते याच वेळी.
एवढ्या वर्षाच्या वाटचालीत असंख्य हितशत्रू खात्यात जमा झालेले असतात.
नाटकांमध्ये वर्षानुवर्षे चिल्लर काम करणारा नटही "मी गणपतराव बेलवलकर लिलया उभा करीन" या घमेंडीत असतो, तशीच ही माणसं ही मी कोणत्याही परिस्थितीला यशस्वीपणे हाताळू शकतो या अहंगंडाला कुरवाळत असतात.
अशा वेळेला दगडाला शेंदूर फासणारी आजूबाजूला वावरतच असतात, अती झाला की दगडाला फासलेला शेंदूर ही कधीतरी ओघळतो तशीच ही माणसं ही कधीकधी पाघळतातच.
या ओघळण्या आणि पाघण्यामुळे पायतळी साचतो तो फक्त चिकचिकाट, पाय घसरवून जमीनदोस्त करणारा.
हे दिवस सांभाळायचे दगडाला देव बनवू पाहणाऱ्यांपासून, हरबऱ्याच्या झाडावर चढवणाऱ्यापासून. आपल्या माणसांमध्येच प्रेमाचा शोध घ्यायला हवा,प्रेमाच्या शब्दांच्या पाठी आपली माणसं शोधायला धावणाऱ्यांच्या माथी येते ती क्षणभराची प्रसिद्धी आणि कायमस्वरूपी मनस्ताप.
©चैतन्य सागर (अभय बापट )
Comments
Post a Comment