मोकळ्या आपल्या हाताने
चाफा आभाळा बोलवतो,
रित्या झालेल्या खोडाला
कोण कवेमध्ये घेतो.
किती खोदले तरीही
नाही सापडत धारा
रित्या झालेल्या विहिरीला
कसे फुटेल हो झरा.
रित्या झाल्या सरितेला
कसा फुटावा हो पान्हा,
रित्या कोरड्या धरित्रीचा
कसा जगावा हो तान्हा.
रित्या आठवणींची मोळी
कोणी कशाला बांधवी,
नववर्षाच्या यज्ञात
एकेक समिधा अर्पावी.
----- अभय बापट
३०/१२/२०२२
Comments
Post a Comment