एकशे अकरावी दुरुस्ती...
सुरेश द्वादशीवार या एका गांधीवादी पत्रकाराने लिहीलेली एक कादंबरी.
काही मुठभर लोकांच्या अमर्याद सत्तेच्या, अमर्याद अधिकाराच्या लालसेपोटी एकशे अकराव्या घटना दुरुस्तीचा घाट घातला जातो.
त्याला लोकांचा पाठिंबा मिळावा म्हणून लोकांना असुरक्षित वाटावे अशा अफवा पसरवल्या जातात, खून, हत्या, अपघात घडवले जातात.
एक लष्करी वैमानिक, देशभरातील माहितीचे संकलन, वर्गीकरण, विश्लेषण करणाऱ्या सरकारी खात्यातील एक अधिकारी, एक हुशार, लोकप्रिय पत्रकार यांच्या लक्षात नेहमीपेक्षा वेगळ्या घडणाऱ्या गोष्टी लक्षात येतात.
ती पत्रकार या सर्व गोष्टींची माहीती विवेकी,देशभक्त, लोकशाही प्रेमी गृहराज्यमंत्र्यांना देते.
गृहराज्यमंत्री हे सर्व सरन्यायाधीशांना सांगतात, सरन्यायाधीश सर्व घटनांची माहीती राष्ट्रपतींना देतात आणि विधेयक सरकरकडे परत विचारासाठी पाठवण्याची विनंती करतात आणि.....
मॉर्निंग वॉक साठी निघालेल्या सरन्यायाधीशांचा भिषण अपघात होतो.
मृत्यूपूर्व जबाबात न्यायाधीश सुरवातीलाच म्हणतात," माझा मृत्यू अपघाती नाही तर एकशे अकराव्या घटना दुरुस्तीचा मी पहिला बळी आहे."
गृहराज्यमंत्र्यांचा उपस्थितीत दिलेल्या या जबावाचे रेकॉर्डींग ते विविध राज्यांच्या विधानसभेत ऐकवण्याची व्यवस्था गृहराज्यमंत्री व्यवस्था करतात.
आणि
एकशे अकरावी घटना दुरुस्ती बहुसंख्येने विधानसभांमध्ये फेटाळली जाते.
कादंबरीत 'इंडीयन ओपनियन' या वृत्तपत्राच्या संपादकांनी राज्यसभेच्या खासदारांना लिहीलेले खुले पत्र.
'या देशाचे संविधान ही त्याच्या पाच हजार वर्षांच्या अनुभवांची फलश्रुती आहे. इतिहासात निर्माण झालेल्या आणि प्रत्येकच शतकाने मनोमन जपलेल्या महान परंपरांची ती परिणती आहे. समाजनिष्ठा आणि व्यक्तिस्वातंत्र्य यांचा समन्वय साधणारा तो महाग्रंथ आहे. कोणत्याही धर्मग्रंथाहून, इतिहासात झालेल्या कोणत्याही कायद्याहून तो श्रेष्ठ अन् पवित्र आहे. न्याय अन् स्वातंत्र्य, समता अन् बंधुता या नव्या मूल्यांची मांडणी करणारा आणि तरीही परंपरांशी इमान राखणारा तो हुंकार आहे.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या, मृत्यू पत्करलेल्या, तुरुंगवास भोगलेल्या आणि त्या लढ्यांचे नेतृत्व केलेल्या अभ्यासू, थोर लोकनेत्यांची ती निर्मिती आहे. याच संविधानाच्या सीमेत राहून देशाने गेली पन्नास वर्षे आपले स्वत्व सांभाळत वाटचाल केली आहे.
राज्यसभेच्या सभासदांनो, ही सजीव परंपरा मोडीत काढू नका. हे संविधान तीन वर्षांच्या अविरत परिश्रमातून निर्माण झालेले आहे. प्रचंड वाद, चर्चा आणि अखेर सार्वत्रिक सहमती होऊन ते जन्माला आले. ते या देशाच्या जनतेने तयार करून स्वतःला दिले. जनतेने तयार केलेला हा देशाच्या इतिहासातील पहिला कायदा आहे. त्याच्या माहात्म्याला गालबोट लावू नका. घटनेची एकशे अकरावी दुरुस्ती या साऱ्या परंपरेचा विध्वंस करून फक्त एक डझन माणसांच्या हाती देशाचे सर्वाधिकार सोपविणारी आहे. लोकाधिकार संपवून, एकाधिकार निर्माण करण्यासाठी ती केली जात आहे. ही परंपरा विस्कटली तर ते पाप पुढल्या पिढ्या तुमच्या माथ्यावर नोंदविणार आहेत...'
एक इंडियन ओपिनियनच्या संपादकांनी राज्यसभेच्या सभासदांना लिहिलेल्या या खुल्या पत्राने साऱ्या देशात खळबळ माजवली. इंडियन ओपिनियनने पुढे लिहिले;
"भारत हे साधे राष्ट्र वा राज्य नाही. वसुधैव कुटुंबकम् या सनातन सिद्धांतावर आधारलेले ते बहुधर्मीय, बहुवंशीय, बहुभाषिक आणि विविध संस्कृतींचे एकात्म सत्य नांदत असलेले प्राचीन व आगळेवेगळे राष्ट्र आहे. या साऱ्या वैविध्यांना एकाच कायदेशीर आणि आर्थिक व्यवस्थेत जवळ आणणारे ते लोकशाही वास्तव आहे. जगातली एक पंचमांश लोकसंख्या या देशात राहते. हा जगातला सर्वात मोठा बहुआयामी सहअस्तित्वाचा प्रयोग आहे. काही महत्त्वाकांक्षी लोक या यशस्वी वास्तवावर आपल्या राक्षसी महत्त्वाकांक्षेपायी निखारे पसरू पाहत आहेत. त्यांचा प्रयत्न हाणून पाडणे हे प्रत्येकाचे नैतिक कर्तव्य आहे.
'राज्यसभेच्या सभासदांनो, त्या कर्तव्याचे नेतृत्व तुम्ही करावे ही लोकशाहीची मागणी आहे. ज्या संविधानाच्या बळावर तुम्ही त्या महत्त्वाच्या सभागृहाचे सभासद झाला आहात त्या संविधानाविषयीची आपली निष्ठा व्यक्त करण्याचा तोच एक नैतिक मार्ग आहे... या देशाने शांततेच्या अन हृदयपरिवर्तनाच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवले. त्याच मूल्यांच्या बळावर येथे लोकशाही रुजवली गेली. ही मूल्ये पायदळी तुडवू नका. या देशावर मूठभर मस्तवालांची हुकूमशाही लादू नकाटनगरी ह
लगेच दुसऱ्या दिवशी सरकारला पाठिंबा देणाऱ्या वृत्तपत्रांनी एकशे अकराव्या दुरुस्तीचे समर्थन करणारे अग्रलेख प्रकाशित केले. 'दुरुस्तीला विरोध हा देशद्रोहच !' अशा मथळ्यानिशी टाइम्सने लिहिलेल्या अग्रलेखात ही दुरुस्ती मान्य करून राज्यसभेच्या सभासदांनी आपल्या देशभक्तीचा परिचय दिला पाहिजे असे सरळ आवाहन केले.
सद्य परिस्थितीशी साधर्म्य दिसत असले तरी ही कादंबरी वीस-बावीस वर्षांपूर्वी प्रकाशित झाली आहे.
काळ बदलला आहे, माणसं बदलली आहेत, विरोधी पक्ष नामशेष केले गेले आहेत. विवेकी राजकारणी आता नावालाही शिल्लेक राहीलेली नाहीत.
खेळ अजूनही तसाच चालू आहे.....
Comments
Post a Comment