कधीतरी वाटते
ओसाड तळ्याकाठी
उतरावा एक पक्षी,
त्याच्या नाचऱ्या पावलांनी
मातीत उमटावी नक्षी.
कधीतरी वाटते
तापल्या भुईवर
हलकीशी यावी सर,
निष्पर्ण मातीतून
फुलून उठावा बहर.
कधीतरी वाटते
मोकळ्या अंगणात
रासलीला रंगून जावी
सावळ्या कृष्णासाठी
राधाही धावून यावी.
कधीतरी वाटते
धारानृत्य रंगावे
आभाळाच्या पटावर
धरेलाही फुटून पान्हा
अमृताने यावे वर.
कधीतरी वाटते
अभ्र सारे सरावे
प्रगटावा अनाहत नाद
चैतन्याच्या चांद राती
अज्ञातातून यावी साद.
-----अभय बापट
२०/०५/२०२५
Comments
Post a Comment