दगडालाही फुटे पाझर असे येतात काही प्रहर, तरी माझ्या बोटांमधून का न येई शब्दांचा पाझर. तप्त उन्हाच्या वाटेवरती काही झाडांना येतो बहर, आणि माझ्या आयुष्याला का सुचे ही उफराटी लहर. शहाणपणाचे वागणेही कधी मुर्खपणाचे वाटे, शांत,तृप्त निसर्गाला वाटेवर वादळवारा गाठे. कुठून येतो घेवून जन्म हळवे रंग या भूमीवर, बेरंग या आयुष्याला कोण उधळतो धरणीवर. कसे भाळतो मीपणावर ओळख नसता आपली आपण का धावतो पाठी पाठी मनावरती ठेवून दडपण. -----अभय बापट ०७/०५/२०२६