Skip to main content

Posts

Showing posts from June, 2026

नवा पाऊस

पाऊसही आता माणसासारखा वागायला लागलाय वेळ देऊनही मुहूर्त टाळायला लागलाय. पाऊसही आता माणसासारखा वागायला लागलाय  दोन थेंब शिंपडून लाईक कॉमेंट्स वाट पहायला लागलाय. पाऊसही आता माणसासारखा वागायला लागलाय  आकाशाचा अर्थ लावत भूमीला कोसायला लागलाय. पाऊसही आता माणसासारखा वागायला लागलाय  भरलेलं आभाळ सोडून वाऱ्यासंग धावायला लागलाय. पाऊसही आता माणसासारखा वागायला लागलाय  नात्यांसारखाच आता अधांतरी रहायला लागलाय. पाऊसही आता माणसासारखा वागायला लागलाय  एकीकडे भरुन येवून दुसरीकडे बरसायला लागलाय. -----अभय बापट      ३०/०६/२०२६

पाऊस

आला धावून वरुण  मायमातीच्या घरात, आला खुशीत समुंदर सरी गातात सुरात. माय घेते ओढून  डोई सुखाचा पदर, तृणबाळांना पाजते आपल्या कुशीतले नीर. डोईवर निर्झरांचा चाले अवखळ खेळ, वाऱ्यासंगे उठतो हा मृदगंधाचा कल्लोळ. आली समोरी स्वागताला नेसून शालू हिरवागार, सुंदर फुलांनी सजला तिचा झुळझुळता पदर. धरणी मायेच्या हुंकाराला साद आभाळातून येई, समृद्धीच्या पावलांनी लक्ष्मी घरामध्ये येई. ये ग, ये ग, लक्ष्मी  घराकडे परतून धरेचा धरुन हात  उंबरा ओलांडून. -----अभय बापट. २४/०६/२०२६