आला धावून वरुण
मायमातीच्या घरात,
आला खुशीत समुंदर
सरी गातात सुरात.
माय घेते ओढून
डोई सुखाचा पदर,
तृणबाळांना पाजते
आपल्या कुशीतले नीर.
डोईवर निर्झरांचा
चाले अवखळ खेळ,
वाऱ्यासंगे उठतो हा
मृदगंधाचा कल्लोळ.
आली समोरी स्वागताला
नेसून शालू हिरवागार,
सुंदर फुलांनी सजला
तिचा झुळझुळता पदर.
धरणी मायेच्या हुंकाराला
साद आभाळातून येई,
समृद्धीच्या पावलांनी
लक्ष्मी घरामध्ये येई.
ये ग, ये ग, लक्ष्मी
घराकडे परतून
धरेचा धरुन हात
उंबरा ओलांडून.
-----अभय बापट.
२४/०६/२०२६
Comments
Post a Comment