तुझी नशा पुन्हा पुन्हा भुलवून टाकते
तुझ्या सुगंधाने मन हे उगाच वेडावते,
नको फुलूस अशी रात्री तू पुन्हा पुन्हा
तुझ्याविना उदासी ही घुटमळत राहते.
अनेकदा तुझ्यामुळे मनात रान माजते
अनेकदा तुझ्यामुळे नागीण सळसळते
नको चेतवू अशी अंतरंग पुन्हा पुन्हा
तुझ्याविना एकांतीही गर्दी देहात दाटते..
वाटते पुन्हा पुन्हा तुझ्या समीप रहावे
वाटते पुन्हा पुन्हा डोळे भरुन पहावे,
नको घोळवू मनात तू विभ्रमाचा गोडवा
तुझ्याविना रात्र एक युगासमान भासते.
वाटते पुन्हा पुन्हा तुझ्या रंगात रंगावे
वाटते पुन्हा पुन्हा तुझ्या गंधात नहावे,
नको मांडू अशी रंगगंधाची आरास तू
तुझ्याविना फुलांचेही सौंदर्य लोप पावते.
०२/०६/२०२२
Comments
Post a Comment