नाही मिळत कोठे उसने पंखामधले बळ
ठेव पाय भुईवर आणि भर कवेत आभाळ
नाही देत कोणा कोणी फुकटची साऊली
बांध घरटे उबेत आणि हो जगाची माऊली.
नाही देत कोणी फुका ज्ञानाचा प्रकाश
हो सावित्रीची लेक आणि धर पुस्तकांचा ध्यास.
नाही उगाच दरवळत जीवनाचे चंदन
मान ठेव श्रमांचा आणि कर सत्याला वंदन.
नाही मिळत सहज कुणाला कीर्तीचे ते धन
जप ध्येय मनाशी आणि कर परिश्रम साधन.
नाही घालत उगाच गळ्यामध्ये यश किर्तीचा हार
ठेव जिद्द मनामध्ये आणि घाल अंधारावर वार.
--- अभय बापट
०८/०३/२०२६
Comments
Post a Comment