वेदनेचे रंग गहिरे
आयुष्याला घाली कोडे,
सुखदुःखाच्या रंगामधले
कसे घ्यावे थोडेथोडे.
डोळ्यांमध्ये भरुन घ्यावे
उषेमधले रंग गुलाबी,
एकांतामध्ये हळूच गावे
तुझे माझे गीत शराबी.
फुलाफुलांचे रंग आगळे
नात्यांमध्ये असे भरावे,
नावाबद्दल नात्यांच्या मग
किंतू सारे तिथे सरावे.
फुलपाखरी रंग गोजरी
आकाशात भिरकावून द्यावे,
आयुष्याला तुझ्या माझ्या
रंगबेरंगी रंग भरावे.
आभाळाचा रंग निळा तो
हृदयामध्ये असा भरावा
तुझे माझे भेदाभेद मग
मनामधून पूरा सरावा.
वेदनेचे रंग गहिरे
कुपी मध्ये भरुन घ्यावे,
यशाच्या भाळी रेखून
गर्वापासून दूर सरावे.
आठवतले रंग सारे
शब्दांमध्ये भरुन घ्यावे,
गीत म्हणून त्यांनाच मग
आपल्यांसंगे खुषीत गावे.
----अभय बापट.
२८/०२/२०२६
Comments
Post a Comment