ग्रीष्म वनातील...मनातील. (१) तापल्या भूमीच्या कडेवर ऊन ग्रीष्माचे थरथरते, बघून खेळ ढगांचा गालात हळूच हसते. तापल्या तळ्याकाठी निवांत बसतो काळ, पक्षांच्या पंखाखाली सावली शोधते आभाळ. कोकीळेच्या तालावर आम्रवृक्ष करतो नर्तन, मृगजळाच्या मागून संध्याछायेचे आगमन. (२) आता होते असे कधी सापडले मुठीत काही क्षण, आणि उसवते ठायी ठायी अबोध अजाण माझे मन. किती जपावी लागते आता नात्यामधली आपल्या वीण, चुकलेल्या एका क्षणाने फाटते तुटते माझे मन. ओंजळा राहते पुरी रिकामी किती टाळावे लागते रण, सुगंधाच्या क्षणाक्षणाला आतूर उत्सुक माझे मन. कधी टळेल हा ग्रीष्म कधी फुलेल पुन्हा बन, तुझ्या प्रीतीच्या वाटेवर तृषार्त सावळे माझे मन. (३) कसे जपावे अंतरी पिकल्या पानाचे भान, कसे राखावे अंतर मनी भृंगाचे गुंजन. देवा असे का मांडतो ऋतु भरले हे सण, चातकासम आतूर रुपगंधीत माझे मन. कसे थांबवू ओघळणं वेळेच्या ओंजळीतून, कसे सोसावे मौन उसळते अंतरातून. देवा तुझ्या इच्छेने उलगडती सारे क्षण, जपता जपता उमजले हरवणेही एक जतन. कसे मोजावे श्वास ऋतू बदलत्या क्षणी, कसे सोसावे तुटणे स्वप्न जपलेले मनी. शिकवीत जातो काळ सोडून देण...