कसे जपावे अंतरी
पिकल्या पानाचे भान,
कसे राखावे अंतर
मनी भृंगाचे गुंजन.
देवा असे का मांडतो
ऋतु भरले हे सण,
चातकासम आतूर
रुपगंधीत माझे मन.
कसे थांबवू ओघळणं
वेळेच्या ओंजळीतून,
कसे सोसावे मौन
उसळते अंतरातून.
देवा तुझ्या इच्छेने
उलगडती सारे क्षण,
जपता जपता उमजले
हरवणेही एक जतन.
कसे मोजावे श्वास
ऋतू बदलत्या क्षणी,
कसे सोसावे तुटणे
स्वप्न जपलेले मनी.
शिकवीत जातो काळ
सोडून देण्याचे बळ,
पिकले पान गळता
वृक्ष होतो रे सबळ.
----अभय बापट
२५/१२/२०२५
Comments
Post a Comment