कृष्णा,तुझ्या लक्षात तरी आले का रे, जगाला गीतेतून कर्मयोगाची दिक्षा देणारा तू, तू मला या राधेला मात्र निवृत्तीचे वरदान दिले.
कृष्णा, शक्य तरी होते का तुझ्या रंगात रंगलेली ही राधा
दुसऱ्या कोणत्याही रंगात एकरुप होऊ शकेल.
कृष्णा, आकाशाला गवसणी घालण्याच्या नादात या राधेच्या मनाच्या अथांग डोहातील वेदना तुला जाणवलीच नाही का ?
अरे समर्पण हे माझे प्राक्तन असेल तर ते शतकानुशतके स्त्रीयांच्याच कपाळी का गोंदवून ठेवलेस.
कृष्णा,तू युगायुगांना परत येण्याचे वचन दिलेस ही राधा मात्र तुझ्या वचनापासून कोरडीच राहीली, युगे सरली पण ही राधा फक्त वेदनेची, समर्पणाची ओळख बनून राहीली.
कृष्णा,तुझ्या बासरीचे सूर अजूनही यमुनेच्या तीरावरुन आकाशाला गवसणी घालतात, पण ते आता या राधेसाठी कधीच नसतात.
कृष्णा, तू तुझ्या गीतेतून जगाला जीवनाचे सार शिकवलेस, पण तूच जिचे जीवन आहेस त्या राधाला कोण समजवणार ?
कोण कृष्णा, कोण ?
----- अभय बापट
०१/१२/२०२५
Comments
Post a Comment