निरर्थकाची डायरी - आपल्याला एखादे फुल,फळ आवडते,आपण त्याचे बी मिळवून रुजत घालतो. ते रुजवताना आपण आपली सोय बघतो. रोप रुजून येते आपण काळजी घेतोच. आपण त्या रोपाच्याच एवढे प्रेमात पडतो की आपल्या सोयीनुसार रुजवलेले ते रोप त्याच्या आवश्यकतेनुसार योग्य जागी लावायचेच विसरुन जातो. प्रत्येक झाडाला त्याची त्याची स्पेस हवी असते, त्यांची गरज वेगवेगळी असते. ती योग्य स्पेस, योग्य वातावरण मिळाले नाही तर ती खुरटतात किंवा ती जोरदार वाढली तरी त्यांची वाढ आपल्यालाच त्रासदायक ठरते. जे झाड आपण जपले तेच तोडून टाकण्याची वेळ आपल्यावर येते. प्रत्येकाला हवी ती स्पेस योग्यवेळी मिळेल हे बघितलं तरच हे साहचर्य आनंददायी ठरते.