दुकानदारी---एक सहज सोप्पा व्यवसाय.
आपल्या धंद्याची सूरवातच " मी माझा वेळ जाण्यासाठी चालू केला आहे" इथून होते. मग धंदा उघडण्याची आणि बंद करण्याची वेळ आपल्या लहरीवर अवलंबून असते यात नवल ते काय ?
आपला बिझनेस स्टडी काय असतो ? कोणता धंदा,व्यवसाय आपल्या जवळपास सुरळीत जोमाने चालू आहे ते बघायचे आणि त्याच्या बाजूलाच तोच व्यवसाय सुरु करायचा, शेजारच्याचे ५०% तरी ग्राहक आपल्याकडे येतीलच या विश्वासाने आणि मग हातखंडे प्रयोग चालू करायचे,स्वत:चा उद्योग वाढवण्यासाठी नाही बरं का, शेजाऱ्याचे दिवाळे निघावे यासाठी.
व्यवसाय आणि कुटुंब,मित्रमंडळी यांना वेगवेगळे ठेवणे आपल्याला कधीच जमत नाही. तुमच्या व्यवसायाचा फायदा उठवायला सगळी असतात पण तुम्हाला मदत लागेल त्या गरजेच्या वेळी कोणीच धावून येत नाही.
आपण वस्तू एमआरपी पेक्षा २ रु. जास्त घेवून विकतो आणि कोणी विचारलेच तर " आमचा हा रेट आहे,हवं घ्या" हा आपला रोखठोकपणा आपल्या तोंडात हजर असतोच.
आपल्याला गिऱ्हाईकाकडून जास्तीत जास्त किंमत हवी असते आणि आपल्याला माल पुरवणाऱ्याकडून तो कमीतकमी किंमतीत पदरात पाडून घ्यायचा असतो, धंदा आहे फायदा बघणं हे कितीही खरे असले तरी, व्यवसाय ही एक साखळी असते, जोपर्यंत साखळीतले सर्व दूवे समाधानी असतात तो पर्यंतच धंदा सुरळीत चालू राहतो.
पण आपण आपल्या समाधानासाठी मधले दुवे बदलत राहतो,त्यामुळे धंदाही अडखळत चालतो.
आपल्या हातातील आनंदाच्या फुलाचा सुगंध कायमचा मिळायला हवा असेल तर फुलांनी भरलेली ओंजळ जरा लांब धरली पाहीजे,आपल्या बरोबरचे सर्वच जर त्या सुगंधाने प्रफुल्लित झाले तर तो सुगंध जास्तच आनंद देत राहतो.
चला नव्याने व्यवसायात पडणारे मराठी तरुण कुठे चुकतात सांगा बघू.
अभय बापट
२१/०५/२०२२
Comments
Post a Comment