Skip to main content

राधाकृष्ण -- राधा

कृष्णा,
         कोणतरी आपलं आहे, आपल्यासाठी आहे, नेहमीचा सहवास,संपर्क नसला तरी दुर राहूनही कोणीतरी आपलं आहे ही भावनाच किती गोड आहे.दुधावरच्या सायी सारखी स्निग्ध,मुलायम.
          कधीतरी अचानक ही जाणीव तुटते, तोडली जाते,नष्ट होते तेव्हा जाणवणारी वेदना कोणाला सांगावी.
           कृष्णा तुलासुद्धा काहीजणांना दूर सारावे लागले,कर्तव्य कर्म म्हणून. तू तर सर्वज्ञ ना रे, तुझ्याही लक्षात आली नाही का वेदना, टाळले जाण्याची, तुटण्याची, एकाकीपणाची, आपलं म्हटलेलं दूर जाण्याची, हातातून हात सुटण्याची.
           महाराणी द्रौपदीनी तुला बोलून तरी दाखवली, कृष्णा वस्त्रहरण तू थांबवू शकत होतास पण तू उशीर करुन तिची लाज तेवढी राखलीस कृष्णा.
            आणि कृष्णा ज्यांच्यावर तीला अतुट विश्वास होता असे तिचे महापराक्रमी पती हतबलपणे मान खाली घालून बसले तेव्हाची तीचा वेदना ?
              आणि माता कुंती अरे आत्याच ना रे तुझी, तीला ही तू द्युतातला सोंगटी सारखे कर्णासमोर उभे केलेस कृष्णा, असेलही तुझे ते राजकारण पण कुंती मातेची वेदना ?
               तुला कोणीच समजू शकले नाही कृष्णा, तुझ्यासारखे अलिप्त कोणीही नाही राहू शकत. तू कधीच कुठे गुंतला नाहीस कृष्णा, ना कुठल्या स्थळी, ना कोणत्या माणसात, ना कोणत्याही प्रसंगात. तू नदीच्या प्रवाहासारखा.
                    कृष्णा, तू नदीच्या प्रवाहा सारख कायम पुढे पुढे जाता राहिलास. प्रवाहातील पाणी हे तिथल्या प्राण्यांसाठी जीवन असते, तिथला निसर्ग ही त्या पाण्यात आपले रुप निरखत असते एकरुप होवून, पण प्रवाह सावकाश पुढे सरकत असतो. त्याला आजूबाजूच्या कशाचीही गंधवार्ता नसते, पाणी पुढे जाते पण त्यांच्यापासून मिळालेली तृप्ततेची भावना,ती असिम असते,अमीट असते.
                     कृष्णा, हीच तृप्ती आम्हा प्रत्येकाला देवून तू पुढे गेलास, मागे कुठेही न गुंतता, तूझे तेच ध्येय होते कृष्णा.
                     पण आम्ही सामान्य माणसं, ती तृप्तीची गोड भावना गोंजारत तूझी वाट बघत बसणारी, तू आहेस, अजूनही आमचाच आहेस या एकमेव अपेक्षेचे धनी.

----अभय बापट

Comments

Popular posts from this blog

विळखा

आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी  उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५

कोजागिरी

पौर्णिमेच्या चंद्र ज्योती, चंद्रिकेच्या दुग्ध धारा मंद गंधा वाहूनिया आणितो हा शीत वारा, रात्र ही साखलेली, चंद्र किरणी माखलेली शीत वारा सेवूनीया काया ही सुखावली, आपुलकी...

बाओबाब अलिबाग

माणसांची वृत्ती बदलली, विचार करण्याची  पद्धत बदलली. आजकाल नवीन झाड लावताना माणूस पहिल्यांदा विचार करतो आपल्याला त्याचा उपभोग घ्यायला मिळणार आहे का ?      एका छोट्याश्या अंकुरापासून भलामोठा वृक्ष बनायला शेकडो वर्ष लागतात.      हे आहे अलिबाग पोलिस लाईनमधले चोरचिंचचे/गोरखचिंचेचे/ बाओबाबचे झाड.      शरदिनी डहाणूकर झाडांना सोयरेआप्त म्हणतात आणि गोरखचिंचेचा उल्लेख आपले पुर्वज असा करतात.       पोलिस परेड ग्राऊंड शेजारी असलेला हा महावृक्ष शेकडो वर्ष वयाचा असावा. पोलिस परेड ग्राऊंडवरची छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा बघून या वृक्षाला महाराजांची आठवण येत असेल का ?कदाचित त्याने त्याच्या तरुणपणी महाराजांना बघितलेही असेल.        सरखेल कान्होजी आंग्रे यांनाही त्याने नक्कीच बघितले असेल.         त्याचा ही ऊर भरुन येत असेल परेड ग्राऊंडवरची तटबंदीची प्रतिकृती बघून, समोर महाराजांना बघून. तो ही हरवून जात असेल इतिहासाच्या रम्य स्मृतीत. ----अभय बापट ११/०६/२०२४