त्या जून्या वाटेवरुनी
फिरुनी साद आली,
आठवांच्या सुगंधाने
पायवाट मोहरीली.
तेच शब्द, तेच श्वास
मनात गर्दी झाली,
आपुलकीची ऊब
मनावर पांघरली.
रेंगाळत्या क्षणांची
झाडे पुन्हा मोहरली
बालपणींच्या सोबत्यांची
आठवण जागवली.
वाटेवरच्या वळणावर
थांबून वेळ बोलली
अरे इथेच तर तुझी
आयुष्याशी भेट झाली.
त्या जून्या वाटेवरती
ओळख नव्याशी झाली
पहाटवेळच्या किरणांनी
कर्तृत्वाला जाग आली.
नव्या जून्या क्षणांची
भेट इथेच झाली
त्या जून्या वाटेवरुनी
ओळख नव्याने झाली.
----अभय बापट
Comments
Post a Comment