कृष्णा,
कोणतरी आपलं आहे, आपल्यासाठी आहे, नेहमीचा सहवास,संपर्क नसला तरी दुर राहूनही कोणीतरी आपलं आहे ही भावनाच किती गोड आहे.दुधावरच्या सायी सारखी स्निग्ध,मुलायम.
कधीतरी अचानक ही जाणीव तुटते, तोडली जाते,नष्ट होते तेव्हा जाणवणारी वेदना कोणाला सांगावी.
कृष्णा तुलासुद्धा काहीजणांना दूर सारावे लागले,कर्तव्य कर्म म्हणून. तू तर सर्वज्ञ ना रे, तुझ्याही लक्षात आली नाही का ही वेदना ?टाळले जाण्याची, तुटण्याची, एकाकीपणाची, आपलं म्हटलेलं दूर जाण्याची, हातातून हात सुटण्याची?
तुला कोणीच समजू शकले नाही कृष्णा, तुझ्यासारखे अलिप्त कोणीही नाही राहू शकत. तू कधीच कुठे गुंतला नाहीस कृष्णा, ना कुठल्या स्थळी, ना कोणत्या माणसात, ना कोणत्याही प्रसंगात. तू नदीच्या प्रवाहासारखा.
कृष्णा, तू नदीच्या प्रवाहा सारख कायम पुढे पुढे जाता राहिलास. प्रवाहातील पाणी हे तिथल्या प्राण्यांसाठी जीवन असते, तिथला निसर्ग ही त्या पाण्यात आपले रुप निरखत असते एकरुप होवून, पण प्रवाह सावकाश पुढे सरकत असतो. त्याला आजूबाजूच्या कशाचीही गंधवार्ता नसते, पाणी पुढे जाते पण त्यांच्यापासून मिळालेली तृप्ततेची भावना,ती असिम असते,अमीट असते.
कृष्णा, हीच तृप्ती आम्हा प्रत्येकाला देवून तू पुढे गेलास, मागे कुठेही न गुंतता, तूझे तेच ध्येय होते कृष्णा.
पण आम्ही सामान्य माणसं, ती तृप्तीची गोड भावना गोंजारत तूझी वाट बघत बसणारी, तू आहेस, अजूनही आमचाच आहेस या एकमेव अपेक्षेचे धनी.
----- अभय बापट
Comments
Post a Comment