चैत्र वैशाख हसती,
वसंत फुलवी बाग,
उंच गुढीच्या दर्शनाने
येई नववर्षाला जाग.
ज्येष्ठ आषाढ तापती,
ग्रीष्म होईल प्रखर,
वटसावित्री व्रतात
माया विश्वासावर भर.
श्रावण भादवा येती,
वर्षा ऋतू घेई धाव,
नागपंचमी, कृष्णजन्म,
मनात भक्तीचा भाव.
आश्विन कार्तिक शोभती
शरदाच्या शुभ्र चांदण्यात,
नवरात्र, दीपावलीचे
आनंद उत्साहात स्वागत.
मार्गशीर्ष पौष थंडीशी
हेमंताचा होत संयोग,
संक्रांतीच्या गोडव्यात
गीता शिकवी ज्ञानयोग.
माघ फाल्गुन रंगती,
शिशिर खेळतो रंग,
शिवरात्र, होळीसंग
ऋतू स्वतः मध्ये दंग.
---- अभय बापट
Comments
Post a Comment