Skip to main content

राधाकृष्ण २

राधे,
         एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी, सावलीही आपली सोबत सोडायला लागली, नजरेला धुसर दिसायला लागले की समजावे,थांबायची वेळ झाली आहे, मग तो प्रवास कोणताही असू दे. अशावेळी उगाच सुर्याच्या शोधात ऊर फुटेस्तोवर धावणे नक्कीच शहाणपणाचे नाही.
         काळोख दाटतो तो तुम्हाला एक पुर्ण नवा दिवस देण्यासाठीच.
         अशा वेळी आपल्या आजूबाजूला असलेला निरांजनाच्या स्निग्ध उजेडला आपलेसे करावे, त्या शांत उजेडात शांत मनाने विचार करताना आपला मार्ग विचारपुर्वक निवडता येतो, जाणीवपूर्वक चुका टाळत मार्गक्रमण करता येते.
           राधे,प्रेम ही एक सुंदर अनुभूती आहेच पण तो एक दिर्घ प्रवासही आहे. त्याच्या कणाकणावर आणि क्षणाक्षणावर अद्भुत सौंदर्याचा सडा पडलेला असतो,तो प्रवास पूर्ण करणाऱ्यांना नात्याचे वरदान लाभते पण प्रेमाला लक्ष्य ठरवणाऱ्यांच्या नशिबात येतो तो निव्वळ व्यवहार,अंतापर्यंत जावूनही अंतहीन.
               राधे, प्रेमात व्यवहार असतोच, कारण प्रेमाला अनेक रंग, गंध असतात आणि ते वेगवेगळे जपावे लागतात. व्यवहार कोणाला चूकलाय राधे, मलाही नाही. प्रेमात व्यवहार क्षम्य आहे राधे, पण व्यवहार म्हणून प्रेम करणारे स्वत:शीच नव्हे तर समाजाच्या विश्वासाशी द्रोह करणारे असतात.
               कोणत्याही प्रवासात योग्य ठिकाणी थांबा घेता येणे हेच यशस्वी प्रवासाचे गमक आहे. नाहीतर लवकर पोहोचूनही खुप काही हातातून निसटून जाते.   


---- अभय बापट 

Comments

Popular posts from this blog

विळखा

आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी  उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५

कोजागिरी

पौर्णिमेच्या चंद्र ज्योती, चंद्रिकेच्या दुग्ध धारा मंद गंधा वाहूनिया आणितो हा शीत वारा, रात्र ही साखलेली, चंद्र किरणी माखलेली शीत वारा सेवूनीया काया ही सुखावली, आपुलकी...

बाओबाब अलिबाग

माणसांची वृत्ती बदलली, विचार करण्याची  पद्धत बदलली. आजकाल नवीन झाड लावताना माणूस पहिल्यांदा विचार करतो आपल्याला त्याचा उपभोग घ्यायला मिळणार आहे का ?      एका छोट्याश्या अंकुरापासून भलामोठा वृक्ष बनायला शेकडो वर्ष लागतात.      हे आहे अलिबाग पोलिस लाईनमधले चोरचिंचचे/गोरखचिंचेचे/ बाओबाबचे झाड.      शरदिनी डहाणूकर झाडांना सोयरेआप्त म्हणतात आणि गोरखचिंचेचा उल्लेख आपले पुर्वज असा करतात.       पोलिस परेड ग्राऊंड शेजारी असलेला हा महावृक्ष शेकडो वर्ष वयाचा असावा. पोलिस परेड ग्राऊंडवरची छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा बघून या वृक्षाला महाराजांची आठवण येत असेल का ?कदाचित त्याने त्याच्या तरुणपणी महाराजांना बघितलेही असेल.        सरखेल कान्होजी आंग्रे यांनाही त्याने नक्कीच बघितले असेल.         त्याचा ही ऊर भरुन येत असेल परेड ग्राऊंडवरची तटबंदीची प्रतिकृती बघून, समोर महाराजांना बघून. तो ही हरवून जात असेल इतिहासाच्या रम्य स्मृतीत. ----अभय बापट ११/०६/२०२४