Skip to main content

Posts

Showing posts from June, 2021

ती

तू तू - मी मी खुप झाले. आता.... तिच्याबद्दल बोलू काही. --------------------------------- ती गाण्यात होती ती गळ्यात होती हृदयाला छेडणा-या  तारेतही तीच होती. ती शब्दात होती ती कडव्यात होती शब्दाशब्दात लपलेल्या भावातही तीच होती. ती फुलात होती आसमंतात होती, फुलाफुलात गोठलेल्या गंधकोषात तीच होती. ती ओठात होती ती मनात होती आठवणीत साठलेल्या कणाकणात तीच होती.

निरर्थकाची डायरी ७

निरर्थकाची डायरी--       पुर्वी सापाचा धक्का लागून तो मागून येतो अशी समजूत मनात पक्की होती, तेव्हा माहीतीतला एक माणूस असा धक्का लागल्याचा संशय आला तर स्वत:च्या घरी न जाता शेजाऱ्यांकडे जावून गप्पा मारत बसे, म्हणजे साप पाठून आलाच तर या शेजाऱ्यांच्या घरी यावा.       ही वृत्ती आजही दिसते. मला आठवतयं भावाने एप्रिलमध्ये लस घेतली, लसीकरण आणि करोना टेस्ट शेजारीशेजारी होत होती, एक पॉझिटिव्ह म्हातारबुवा मुद्दाम लशीसाठी आलेल्या लोकांत फिरत होता,त्यांच्या तोंडावरुन हात फिरवत होता.        कोरोनाचा संशय आलेली काहीजणं मुद्दाम दुसऱ्यांच्या तोंडाजवळ तोंड नेवून बोलताना दिसतात ती हीच वृत्ती.          आपण या वृत्तीला टाळू शकत नाही,तोडून टाकू शकत नाही तेव्हा आपल्या हातात एकच असते या लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवणे, फिजिकली आणि मेंटली सुद्धा, नाहीतर वृत्तीची आणि विषाणूंची लागण झालीच म्हणून समजा.

लिटील चॅम्प- छोटीसी बात

बघितलत का काकू, कालची ती चिमूरडी मुलं आज परिक्षकाच्या खुर्चीवल बसलीयत, काहीच कसे वाटत नाही त्यांना ?     अग, अभयंकरणी तुम्हीच न त्यांच्यातली प्रतिभा बघून त्यांना भरभरुन एसएमएस केलेलेत.        अहो काकू, प्रतिभा वेगळी, आयुष्यभर शिकावं लागते तेव्हा कणभर विद्या मिळते हो.          त्या छोट्या मुलांना त्यांची प्रतिभा, त्यांची शिकण्यातली जिद्द आणि प्रतिभा बघून निवडायचे असते हो. पण आता तुम्हाला त्यांच्याबद्दल विश्वास वाटत नाही कारण त्यांना मत देताना तुम्ही त्यांची जात, त्यांचे गाव, वेळ पडली तर त्यांचे लहान वय बघून निवडून देता.           ते सारेगम चालू होतं तेव्हा मी गेलेला भाच्याकडे गावाला, आपल्या गावातील मुलगी म्हणून त्या गरीब शेतकरी लोकांनी वर्गणी जमवून मेसेज करताना मी बघितलेय.           दंडवते काकू, सगळीच काही अशी नसतात हो, काही थोडीजणं तरी गाणं ऐकून मतदान करतात. पण काकू बघा की, त्यांच्या कॉमेंट्समधून अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, महेश काळे यांची झलक स्पष्ट दिसतेय.       ...

बोधकथा

जंगलचा राजा आजारी पडला, थकला, उपासमार होवू लागली,शेवटी त्याने शक्ती एकवटून एका काळविटावर झडप टाकली पण झाले उलटेच, झटपटीत काळविटाची शिंग लागून तो जखमी झाला,एक शिंग तर त्याच्या डोळ्यातच घुसले.                  दुखण्यातून बरा झाल्यावर त्याने शिंग बंदीचा हुकुम काढला, जंगला लहानमोठ्या कोणत्याही प्रकारच्या शिंगाला बंदी. ज्यांना शिंग आहेत त्यांनी शिंग काढून टाकावीत.                  सगळे शिंगवाले प्राणी जंगलचे राज्य सोडून बाहेर निघून गेले.                  या गडबडीत एका सशाने आपली सावली बघितल, सावलीतले कान बघून तो घाबरला. त्याच्या मनात आले "शिपाई रानकुत्रांना हे कान शिंगंच आहेत असे वाटले तर ?"                  घाबरुन तो ससा शेजारी राहणाऱ्या रातकिड्याकडे गेला आणि म्हणाला," मित्रा, मी अखेरचा निरोप घ्यायला आलोय, मी हे जंगल सोडून चाललोय".                    किड्याने विचा...
वेगवेगळी फुले उमलली तीच्या गोऱ्या गालावरी, दरवळतो सुगंध तीच्या मलमली कुंतलावरी. शोधतो नभांतरी मी आठवणींची पाखरे, उमलते हृदय माझे मुग्ध त्या चाफ्यापरी. शोधतो मी अंतरी  पुन्हा पुन्हा ती छबी, सुटून जाते वीण  नात्याची हातातूनी. ईश्वरा तू स्मृती अशी पुन्हा कुणा देवू नको, आपुलकीच्या सुगंधाला कुपीमध्ये कोंडू नको.

दु:ख

मने,       प्रत्येक जखम बांधून ठेवायची नसते, काही जखमा एवढ्या साध्या असतात की मोकळी हवाच तिच्यावर मलमाचे काम करते.       मने, दु:खाच्या गाठोड्यात स्वत:ला बांधून घेतल्याने दु:ख कमी होत नाही तर ते वाढतच जाते. आनंदी क्षणाची छोटीशी झुळूकही दु:खावर उतारा ठरु शकते.          प्रत्येक दु:खावरती पेनिसिलीन लावावे लागत नाही, कधी तुपाचे नाजूक बोट ही दुखणे कमी करते.        मने, हाताला खुपणारे कुस कधीतरी निघतेच , कधी मुद्दाम काढून टाकवे लागते, कधी आपोआप कामाच्या ओघात निघून जाते,कधी आजीच्या मायेच्या हळूवार स्पर्शानेही निघते. ते चांदण्याचे हात आपल्या आजूबाजूला असतातच वेगवेगळ्या रुपात फक्त ते हात हातात घ्यावे लागतात.         मने, दु:खाच्या ओघात का वहावत जावे, त्या प्रवाहात सुद्धा खंबीर रहावे दगडासारखे अविचल,दु:खाचा प्रवाह भेदत. बघ आनंदाचे कणकण वाहत येवून आजूबाजूला जमा होईल.

निसर्गाची जपणूक आणि आपण

प्रसिद्ध निसर्गसंशोधक जॉन मूर म्हणाले होते," तुमच्या पुढच्या पिढ्यांना तुम्ही वाळवंट दाखवणार का ?            डार्विनचा उत्क्रांदीवाद सांगतो, "उपयोग नसलेल्या गोष्टी नष्ट होवून जातात."            निसर्ग अभ्यासक अमित टिल्लू म्हणतात," तुम्ही काहीच न करणे हेच खुप काही करण्यासारखे आहे".             आपल्याला आपली संस्कृती जपायची आहे,आपल्याला आपले आयुर्वेद जपायचा असेल तर आपल्याला आपली वनश्रीसृष्टी जपावीच लागेल.               झाडांना,फुलांना,पानांना जपणे म्हणजे त्यांच्यापासून दूर जाणे नव्हे,तर त्यांच्या जवळ जाणे. आपल्या मुलांना त्यांची ओळख करुन देणे, त्यांच्या उपयोगाबद्दल, त्यांचा सांस्कृतिक महत्वाबद्दल मुलांना माहीती करुन देणे,तरच त्यांना त्यांच्याबद्दल ओढ निर्माण होईल.               आजच अशी परिस्थीती आहे की नेहमीच्या दिसणाऱ्या अनेक वनस्पती ओळखता येत नाहीत. आपटा आणि कांचन यातील फरक  दरवर्षी कानीकपाळी ओरडून सांगावा लागतो.   ...

निसर्गायण

परवा काका म्हणाले " चालत रहा, चालत रहा, चालणाऱ्याला निसर्ग भेटतो, एकदा स्वत:ला अवकाशात बंदिस्त करुन टाकले की निसर्गसुक्त घरातच आळवत बसावे लागते.            स्वामींच्या भाषेत बोलायचे तर " एकदा बंदिस्त अवकाश स्विकारला की त्याला तुरुंग समजायचे की मानसिक उब देणारे देवालय हे आपल्या हातात असते."              अवकाश तरी कुठे निसर्गापासून वेगळा असतो, तो ही निसर्गाचाच एक अंश. तिथेही सुर्य असतोच,कधी दाहक तरी कधी उबदार, हवाहवासा वाटणारा, आत कुठला ऋतू जपायचा हे आपल्याच हातात असते.                तिथेही चंद्र असतो पौर्णिमेचा,शितल चांदणे देणारा.                 तिथेही हवाहवासा वाटतो हिवाळ्यातला गारवा,सफरचंद पिकवणारा.                तिथेही इंद्रधनुष्य उमलून जाते, भरलेला मेघांच्या वर्षावा पाठोपाठ.                तिथेही असते वृक्षांची सावली, वेलींची प्रफुल्लता, फुलांचा सुगंध आणि कोव...

एक क्षण

एक क्षण असतो मुक्त बोलण्याचा एक क्षण असतो मौन पाळण्याचा , नको टाळू तू मौनातले इशारे एक क्षण असतो जीव लावण्याचा. एक क्षण असतो शब्द वाढण्याचा एक क्षण असतो शब्द तुटण्याचा, नको घोळवू तू मनात तेच सारे एक क्षण असतो आपुलकी जपण्याचा. एक क्षण असतो तुटून पडण्याचा एक क्षण असतो स्वत: सावरण्याचा, नको हात खेचू तुझा तू रे मागे एक क्षण असतो उभे राहण्याचा. एक क्षण असतो दु:खी बनण्याचा एक क्षण असतो सुखाचाबिखाचा, नको स्वार होवू दु:खाच्या लाटेवर एक क्षण असतो आनंद लुटण्याचा. एक क्षण असतो निघून जावयाचा एक क्षण असतो पाय रोवण्याचा, नको रे मना निसरड्यावरी धावू एक क्षण असतो सुख भोगण्याचा

ऑक्सिजन-वृक्ष आणि प्रदुषण

मने,      झाले के तुमचे वृक्षारोपण करुन, यंदा ऑक्सिजनचे महत्व प्रकर्षाने लक्षात आले त्यामुळे वृक्षारोपणाचे कार्यक्रम यंदा जरा जास्तच चढाओढीने राबवले जातातायत. जून-जुलैमध्ये अतीपावसाच्या दिवसात लावलेली रोपं किती तग धरतात हा एक संशोधनाचा विषय आहे.        मने, फक्त वृक्षारोपण केलं की आपण ऑक्सिजनच्यासाठी काही करण्याची गरज नाही हा विचारमात्र पुर्णपणे चुकीचा आहे.         पृथ्वीवरचा पन्नास टक्के ऑक्सिजन तर समुद्रापासून मिळतो, समुद्रातील एकपेशीय वनस्पती हा ऑक्सिजन आपल्याला पुरवतात. या वनस्पतींचा सर्वांत मोठा शत्रू आपणच नकळत त्यांच्यापर्यंत पोचवत असते.           जवळपास ६० हजार वेगवेगळ्या प्रकारची केमिकल्स समुद्राच्या पाण्यात सोडली जातात, आपण कचरा म्हणून टाकलेला एक वर्तमानपत्राचा कागद, एक निरुपयोगी ठरलेली औषधाची गोळी, सिंन्थेटिक कापडाचा एक तुकडा, एक प्लॅस्टिकची पिशवी हे सर्व केमिकल नदीमार्फत, गटारामार्फत समुद्रापर्यंत पोचवले जाते. त्या प्रदुषणामुळे समुद्रातील या वनस्पती संकटात सापडतायत पण हे सर्व समुद्र आपल्याला साभार...

कधी वाटते

कधी वाटते तुझेच व्हावे तुझ्या अंतरी स्वत: वसावे, तुझे ओठ,तुझाच श्वास गीत होवूनी जगात यावे. तुझीच आठवण बनून जावे तुझ्याच आठवणीत सदा रमावे, तुझ्याच साठी,तुझ्याच करता जीवन लेवून पुन्हा जगावे. तुझे चांदणे सदा उशाला तुझा सुगंध असो श्वासाला, तुझ्यासाठी, तुझ्या मिठीत भ्रमर होवून बंदी व्हावे.

मनूला पत्र

मने,              सगळीच बोलतात "दुरुन डोंगर साजरे" दुरुन डोंगर कितीही रेखीव दिसत असले तरी ते दिसतात एकसुरीच, हिमालयाच्या शिखरांसारखी काही शिखरेच दुरुनही सुंदर दिसतात,त्यांच्यापासून दुर राहूनच त्यांचे सौंदर्य,भव्यता आदरानी अनुभवावी,नाहीतर बाकीच्या डोंगराजवळ जायला हवे, तरच त्यांच्या अंगाखांद्यावर खेळणारे निर्झर आणी त्यांनी ल्यालेली विविध रंगी वसने अनुभवायला मिळणारच नाहीत.              माणसांच पण असंच असतं काही माणसंच असतात दिपस्तंभासारखी,त्यांच्या नुसत्या असण्यावरुन आपला मार्ग ठरवावा अशी.              बाकीची माणसं मात्र जवळ जावून अनुभवावी.किती विविध रंग असतात स्वभावात लपलेली,खेळावी कधीतरी रंगपंचमी या रंगांचीही,निर्माण होईलही एक नवीनच लोभसवाणी शेड तयार.              निसर्गाकडे जाण्याच्या नादात माणूस हा पण निसर्गाचा अविभाज्य घटक आहे हेच आपण विसरुन जातो मने, जवळ असणा-या माणसांना विसरून जावून दुस-या माणसांना निरखून बघण्यात एवढे गर्क असतो की आपल्या लक्षातच...

मनाची शक्ती

#अलक मामी जेवल्यावर सुगंधीत मसाला पान खात बसली होती, "हा छान वास कसला ?" या प्रश्नाचे चेष्टेत मिळालेले तंबाखूचा हे उत्तर ऐकताक्षणी बसल्याजागी अंग टाकून दिले. गरगरतेय,चक्कर येतेय म्हणून लोळू लागली. आजच्या कोरोना लाटेतही घाबरलेल्या संशयग्रस्त मनाच्या पाठी आपले शरीर फरफटत जाताना आपण बघतो. मन खंबीर तर शरीर खंबीर.

सल

#अलक सकाळी उठल्यावर त्याने मोबाईल उघडला, आज जागतिक पर्यावरण दिन. त्याला लहानपणी खेळायचा तो उंबराचा पार आठवला,ती चिंच तीच्या गाभुळलेल्या चिंचा मुद्दाम मैत्रीणींसाठी शाळेत घेवून जायचा. ते नीर फणसाचे अवाढव्य झाड, त्याच्या फांदीला बांधलेल्या झोपाळ्यावरचा सवंगड्यांचा धुडगूस. तो रायवळ आंब्यावर दगड मारुन कैऱ्या पाडण्याचा खेळ. पातेरं पडतं म्हणून तोडून टाकलेलं एक-एक झाड आठवलं. खिशात पाकीट टाकून, गाडी घेवून नर्सरीत पोचला. गुलमोहर,सोनमोहर,,रेन ट्री, बदामाची झाडं आणून कंपाऊंडच्या बाहेर रस्त्याच्याकडेला लावून टाकली. ती झाडं आता याचा मनाच्या सलावर मलम बनून पातेरं सांडत राहतील, पर्यावरण दिनाच्या फोटोत मिरवण्यासाठी

संध्याकाळ

नको वाटे संध्याकाळ शब्दांचेच वाटे ओझे, दिसभर पेरलेले भुतं होवून मनी नाचे. नको वाटे संध्याकाळ मौनाची ती कातळवेळ, आपुलकीच्या उत्साहाला काळोखचे ग्रहण. नको वाटे संध्याकाळ मावळतीचे रंग दावी, मनीच्या डोहावर व्याकुळतेची शेवाळ येई. नको वाटे संध्याकाळ रातीची ती पाऊलवाट, नित्य नव्याने जायचे त्या अनोळखी जंगलात.