जंगलचा राजा आजारी पडला, थकला, उपासमार होवू लागली,शेवटी त्याने शक्ती एकवटून एका काळविटावर झडप टाकली पण झाले उलटेच, झटपटीत काळविटाची शिंग लागून तो जखमी झाला,एक शिंग तर त्याच्या डोळ्यातच घुसले.
दुखण्यातून बरा झाल्यावर त्याने शिंग बंदीचा हुकुम काढला, जंगला लहानमोठ्या कोणत्याही प्रकारच्या शिंगाला बंदी. ज्यांना शिंग आहेत त्यांनी शिंग काढून टाकावीत.
सगळे शिंगवाले प्राणी जंगलचे राज्य सोडून बाहेर निघून गेले.
या गडबडीत एका सशाने आपली सावली बघितल, सावलीतले कान बघून तो घाबरला. त्याच्या मनात आले "शिपाई रानकुत्रांना हे कान शिंगंच आहेत असे वाटले तर ?"
घाबरुन तो ससा शेजारी राहणाऱ्या रातकिड्याकडे गेला आणि म्हणाला," मित्रा, मी अखेरचा निरोप घ्यायला आलोय, मी हे जंगल सोडून चाललोय".
किड्याने विचारले, "तुला कसली भिती ?"
ससा म्हणाला," माझे कान शिंगासारखे दिसले किंवा उद्या कानावरही बंदी आली तर ?"
रातकिडा भडकला,"अरे कान कुठे,शिंग कुठे ! मला काय बिनडोक समजतोस
काय ?"
ससा म्हणाला, ' मित्रा, हे शासन मनात येईल ते सिद्ध करेल. कान हे शिंगंच आहे असे कोर्टसुद्धा ठरवेल. कायदा गाढव असतो. मी ससा आहे,सशाला शिंग नसतात हे कळवळून सांगितले तरी ते मला दोन शिंगवाला गेंडाही ठरवतील, माझ्याविरुद्ध अनेक साक्षीदार उभे करतील आणि मला फाडून खातील. त्यापुर्वी या जंगलातून पळून जाण्याऐवजी दुसरा मार्ग नाही'.
(१७ व्या शतकातील ला फॉन्तेन या लेखकाची बोधकथा- व्यंकटेश माडगूळकर यांच्या सरवा मधून)
Comments
Post a Comment