माझ्या श्वासांची बासुरी
तीच्या ओठांनी वाजावी,
आजची रात्र तरी
तीच्या सुरात सरावी.
आसुसल्या गात्रांना
तिने कवेमध्ये घ्यावे,
चंद्र आणि चांदण्यांनी
पुन्हा मिलन रचावे.
तीच्या डोळ्यांमधून
दुधाळ चांदणे झरावे,
अंगावर पांघरुण
तीने मायेचे धरावे.
आशेचे अंकुर
पुन्हा मनी रुजवावे,
स्निग्ध तीच्या मनातून
नित्य नेमाने भिजवावे.
माझ्या अंतरीचे बोल
तीच्या शब्दात रुजावे,
माझ्या मनाच्या अंगणात
त्यांचे ठसे उमटावे.
माझ्या डोळ्यातले पाणी
तीच्या मेघात झरावे,
तिच्या रेशमी हाताचे
मोरपंख फिरावे.
माझ्या वेदनांचा बांध
तीच्या अमृताने भरावा,
माझ्या पुढच्या वाटेवर
नवा स्वर्ग उतरावा.
एवढ्याश्या आशेने
माझ्या मनामध्ये यावे,
आणि नभाच्या आडोश्याने
तीने सोनचांदणे शिंपावे.
माझ्या मनामध्ये तीने
घर सजवावे आणि
तिच्या सान्निध्याने
देव शब्दांतून यावे.
१३/०२/२०२२
Comments
Post a Comment