झाडं सगळं सहन करतात,
बदललेल्या ऋतूं पासून,
बदललेल्या माणसांपर्यंत
घरटं सोडून जाणाऱ्या पक्षां पासून,
रस्ता हरवलेल्या पाखरांपर्यंत.
सहन करतात म्हणजे दुखत नाही असं नाही,
वाऱ्यावर डोलताना दिसतात म्हणजे रडत नाहीत असं नाही.
पण आशेने सांभाळत बसतात,
खोलवर रुजलेल्या मुळांना
आणि
हिरवागार रंग घेतलेल्या पानांच्या तुऱ्यांना.
आशा ऋतू पुन्हा वेळापत्रक सांभाळतील,
पक्षी पुन्हा गाणी गातील,
पिल्लांना शिकवण्यासाठी फांद्यांचे झोके करतील.
माणसही पुन्हा माणसासारखी वागतील,
भरभरुन खुडताना,कणभरतरी भुईला देतील.
माणसंसुद्धा झाडांसारखीच
आशेचे पंख लावून उभी असतात आजकाल. हिरवळीच्या कोपऱ्यावरच्या ओलाव्याच्या शोधात, कोणी कृतज्ञतेने आणून रोवेल आठवणींचे बीज, ज्यातून फुलतील माणूसकीचे मळे,
एकमेकांच्या दु:खाने होरपळणारे
आणि
आनंदाच्या तृणावर फुल होवून डोलणारे.
२५/०२/२०२२
Comments
Post a Comment