येणार असशील तर नकळत ये
चांदण्याचे पाऊल घेवून ये,
उशाशी ठेवलेल्या बकुळीचा
धुंद सुगंध होवून ये.
येणार असशील तर पावसाची
संतत धारा होवून ये
बटांवरुन ओघळणारा छोटासा
तृप्त थेंब होवून ये.
येणार असशील तर वाऱ्याची
थंड झुळूक होवून ये
गोड शिरशिरी अंगावरती
मनावर उब पांघरुन ये.
येणार असशील तर सूर्याचा
नवीन किरण होवून ये
अस्तित्वाला उजळत उजळत
नव जीवन घेवून ये.
येणार असशील तर धुक्याची
ओली चादर होवून ये
कुंद हवेला धुंद करत
धुंद आठवणी घेवून ये.
येणार असशील तर सुखाचे
कोवळे पाऊल होवून ये,
सौख्यदायी जगण्या मधले
सारे समाधान घेवू ये.
Comments
Post a Comment