Skip to main content

भूतदया...

भूतदया....

    तो श्वानप्रेमी, कुत्र्याला कुत्रा म्हटले तर कुत्र्याच्या मालकाच्या भावना दुखावतात. तर,तो श्वानप्रेमी आपल्याकडे जन्माला आलेल्या आणि ओझं झालेल्या छोट्याश्या पिल्लाच्या आयुष्याची दोरी तापलेला रस्ता आणि तळपत्या ऊन्हाच्या स्वाधीन करुन आपल्या घराच्या सावलीकडे निघून गेला.
      तो इवलासा गोळा आपल्या काळ्याभोर, भेदरलेल्या डोळ्यांनी बघत रस्त्यावरच्या गाड्यांपासून स्वत:ला वाचवण्यासाठी पुलाच्या कठड्याला चिकटून बसला होता.
     रस्त्यावरुन सायकलवरुन जाणाऱ्या एका शाळकरी मुलाच्या मनातली भूतदया जागी झाली, तो सायकलवरुन उतरला आपल्या वॉटरबॅगमधले थोडसे पाणी त्या पिल्लाच्या तोंडात ओतले आणि दोन मिनिटे विचार करत उभा राहीला.
     काय विचार केला त्याचे त्यालाच ठावूक, त्याने त्या पिल्लाला अलगदपणे उचलले आणि आदल्या दिवशी देवाला वाहिलेली फुले दुसऱ्या दिवशी निर्माल्य झाल्यावर जेवढ्या निर्विकारपणे पुलावरुन पाण्यात विसर्जित केले जाते, तेवढ्याच निर्विकारपणे त्याला पुलावरुन खालच्या पाण्याच्या स्वाधीन केले.
       रस्त्यावरची रहदारी सेकंदभरासाठी विस्कळीत झाली, काहीजण हळहळत त्या मुलाकडे रागाने बघत पुढे सरकली.
        एक भूतदयावादी टपोरी खाली उतरला त्या मुलाच्या गालाची प्रेमळपणे चौकशी करुन, तांबारलेल्या डोळ्याने त्या मुलाच्या डोळ्यातले पाणी बघत कर्तव्य केल्याच्या आनंदात बाईकवर स्वार झाला.
         तिकडे पुलाखाली नियती त्या पिल्लाच्या आयुष्याचा दोरी हातात घट्ट पकडून उभी होती.
         पुलाखाली असणाऱ्या दोन मुलांनी पाण्यात पडलेल्या त्या पिल्लाला अलगद जवळ घेतलं, काढून ठेवलेल्या आपल्या टिशर्ट मध्ये गुंडाळून त्याला आपल्या छोट्या होडक्यात ठेवून परत पाण्यात बुडी मारुन रेती काढण्यात गर्क झाली.

०४/०४/२०२२

Comments

Popular posts from this blog

विळखा

आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी  उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५

कोजागिरी

पौर्णिमेच्या चंद्र ज्योती, चंद्रिकेच्या दुग्ध धारा मंद गंधा वाहूनिया आणितो हा शीत वारा, रात्र ही साखलेली, चंद्र किरणी माखलेली शीत वारा सेवूनीया काया ही सुखावली, आपुलकी...

बाओबाब अलिबाग

माणसांची वृत्ती बदलली, विचार करण्याची  पद्धत बदलली. आजकाल नवीन झाड लावताना माणूस पहिल्यांदा विचार करतो आपल्याला त्याचा उपभोग घ्यायला मिळणार आहे का ?      एका छोट्याश्या अंकुरापासून भलामोठा वृक्ष बनायला शेकडो वर्ष लागतात.      हे आहे अलिबाग पोलिस लाईनमधले चोरचिंचचे/गोरखचिंचेचे/ बाओबाबचे झाड.      शरदिनी डहाणूकर झाडांना सोयरेआप्त म्हणतात आणि गोरखचिंचेचा उल्लेख आपले पुर्वज असा करतात.       पोलिस परेड ग्राऊंड शेजारी असलेला हा महावृक्ष शेकडो वर्ष वयाचा असावा. पोलिस परेड ग्राऊंडवरची छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा बघून या वृक्षाला महाराजांची आठवण येत असेल का ?कदाचित त्याने त्याच्या तरुणपणी महाराजांना बघितलेही असेल.        सरखेल कान्होजी आंग्रे यांनाही त्याने नक्कीच बघितले असेल.         त्याचा ही ऊर भरुन येत असेल परेड ग्राऊंडवरची तटबंदीची प्रतिकृती बघून, समोर महाराजांना बघून. तो ही हरवून जात असेल इतिहासाच्या रम्य स्मृतीत. ----अभय बापट ११/०६/२०२४