Skip to main content

Posts

Showing posts from 2023

असणे जपणे

दिसणे तुझेच आहे, असणे तुझेच आहे, आयुष्यभराचे हे माझे जपणे तुझेच आहे. बघून चांदण्याला गुंतणे तुझेच आहे, श्वाससवे सुगंधी बहरणे तुझेच आहे. तुझे आणि माझे द्वैत सरुन गेले दुरावली साथ जरीही झुरणे तुझेच आहे. माझे आयुष्यभराचे जगणे तुझेच आहे, श्वासांचे उरलेसुरले दान मागणे तुझेच ही. माझे मीपण तुझ्या कोंदणात मिरवतो मी माझे मीपण असे मिरवणे तुझेच आहे. ------ अभय बापट २०/१२/२०२३

तोल

काट्यावरती तोल तनूचा  असा सावरु नको ताई तू उगाच घाबरु नको. वाटीमध्ये चिवडा-लाडू  घास बर्फीचा हवा ताई तू बनव फराळ नवा. डोळ्यामधूनी भाव तृप्तीचा येवू दे जन्माला पुन्हा ताई खव्याचाच लाडू हवा. कोण येते पुन्हापुन्हा घेवून जन्मा नवा ताई पोटभरा अनरसा खावा. काट्यावरती तोल तनूचा असा सावरु नको, ताई तू उगाच घाबरु नको. ---- अभय बापट ०८/११/२०२३

मुखवटे

मांडला होता तिथे लिलाव चेहऱ्यांचा मुखवट्यांना तेव्हा भारी बोली लागली. ---अभय बापट २५/१०/२०२३

असे वाटते.....

थोडेसे बोलावे असे वाटते तुटलेले जोडावे असे वाटते उगाच येतो अहंकार आडवा  मीपण सोडावे असे वाटते. पावसात ओघळावे असे वाटते पुन्हा फुलावे असे वाटते उगाच येतात दिवस वेंधळे मार्ग शोधावे असे वाटते. संवाद साधावा असे वाटते भाव जाणावे असे वाटते एकमेकांमधले अंतर तोडून हात मिळवावे असे वाटते. किती शिल्लक उन्हाळे असे हिवाळे जपावे असे वाटते, संपून गेला बहर तरीही आठवणीत रहावे असे वाटते. ---- अभय बापट

निर्णय

निर्णय चुकतात, चुकू द्यावे श्रेय हुकतात, हुकू द्यावे जगता जगता आयुष्याकडून जुगारातले दान घ्यावे. बंध सुटतात,सुटू द्यावे माणसं तुटतात, तुटू द्यावे जगता जगता नात्याकडून आपुलकीचे फुल घ्यावे. मार्ग चुकतात, चुकू द्यावे रस्ते सरतात, सरु द्यावे चालता चालता रस्त्याकडून सावलीचे दान घ्यावे. प्रश्न पडतात, पडू द्यावे उत्तरं चुकतात,चुकू द्यावे सोडवता सोडवता उत्तराकडून  ज्ञानाचे कण घ्यावे. ध्येय हुकतात, हुकू द्यावे अनुभव मुकतात, मुकू द्यावे जगता जगता अनुभवाकडून स्वत्वाचे भान घ्यावे. ------ अभय बापट ०५/०८/२०२३

शब्दशिवारातला शेतकरी

डोळे थकले आता पुन्हा एकदा येवून जा रानातल्या कविता शहरांमध्ये गाऊन जा. एकाकी माणसांना तुझे शब्द ऐकवून जा आजोळची गाणी शाळेमध्ये शिकवून जा. आंब्याच्या मोहराचा कोवळा सुवास गजबजलेल्या शहरात पाठीमागे ठेवून जा. गाभूळल्या चिंचेचा आंबटगोड घास चव विसरलेल्या जिभेला उ:शाप देऊन जा. तुमच्या मनामधला दयाघन माझ्या मनात रोवून जा साध्यासुध्या जगाचे गीत नव्याने गाऊन जा. ------ अभय बापट ०४/०८/२०२२

इलाज नाही

गर्भात वेदनेच्या रुजवू नकोस काही उसळू दे वेदनांना त्याला इलाज नाही. उसने घेवून बीज पेरु नकोस काही मातीत खोट आहे त्याला इलाज नाही. सद्भाव माणसांचा आणि स्वप्ने सुखाची विषवल्लीनी वेढली त्याला इलाज नाही. बोल ते फुकाचे आणि आदर्श देवाघरचे नजरेत विखार आहे त्याला इलाज नाही.  ------- अभय बापट २९/०७/२०२३

संस्कार

संस्काराची भाषा करणाऱ्यांवर भाषेचे संस्कार झालेले असतातच असे नाही. -----अभय बापट ०७/०७/२०२३

अढी

            कधीतरी मनात खोलवर एखादी अढी बसलेली असते, आपल्याला जाणवतही नाही पण एखाद्या प्रसंगात ती उसळी मारुन वरती येते तेव्हा आपल्यालाच नवल वाटते.             ॲनॅसिन बंद झाल्यावर दुकानदाराकडे त्याला पर्यायी गोळी कुठली विचारले तेव्हा त्याने सॅरिडॉन सजेस्ट केली आणि मनात खोलवर बसलेली अढी उसळी मारुन वरती आली.               FY ला असताना आमच्या काणे सरांनी रोश विरुद्ध ॲडम्सच्या लढ्याची कथा वर्गात सांगतली होती, अजूनही सरांचा सांगताना झालेला लालबुंद चेहरा डोळ्यासमोर येतो.               आता पिरॅमलची असलेली सॅरिडॉन कधीकाळी रोशची होती, त्यावेळी रोशबद्दल मनात बसलेली अढी अजून सॅरिडॉनला मनापासून नकार देते.                 अशा खुप गोष्टींबद्दल,माणसांबद्दल बसलेली अढी आपल्या माणसांपासून, आनंदापासून कायमची दूर ठेवते, लक्षातही न येता.               

हे सारस्वतांनो

प्रतिभावंत जनांनो जमू इथेच आता झाडावरच्या कळ्यांनो उमलू इथेच आता. साहित्य सुमनांचे वेचू सुगंध थोडे  आपले बोल बोबडे बोलू इथेच आता. नक्षत्रांची पायवाट उजळली त्यांनीच आहे त्या वाटेवरुन आपणही चालू इथेच आता. कल्पकता आणि कलांचा घेवून वारसा हा आनंद कणाकणांनी उधळू इथेच आता. ते कण अमृताचे देवून ज्ञानवंत गेले ते क्षण भाग्यवंत वेचू इथेच आता. ---अभय बापट २४/०५/२०२३

बंधन

उंची गाठण्यासाठी मी जेव्हा प्रयत्न केले पायच माझे त्यांनी तेव्हा छाटून टाकले. नव्हते स्वप्न माझेही कोणतेही जगावेगळे जातीत जगाला त्यांनी तेव्हा वाटून टाकले. पोटासाठी घेतली मी तरीही भरारी वगैरे राशीतले दाणे त्यांनी तेव्हा झाकून टाकले. ठेवली होती थोडी हिरवळ आठवणींची  आठवणीने त्यांनी तेव्हा पाणी तोडून टाकले. साधे सोपे नाही राहीले जगणे आता आधीच त्यांनी तेव्हा कळीला खुडून टाकले. --- अभय बापट २४/०५/२०२३

आई

नदी सारखी प्रत्येक वळणावर नव्याने भेटत असते आई. वाहता वाहता कणाकणाला समृद्ध करत असते आई. नात्याच्या प्रत्येक रंगाला नवी ओळख देत असते आई. रंगांवाचूनही आयुष्यामध्ये रंग भरत असते आई. ----अभय बापट मदर्स डे १४/०५/२०२३

तुझ्या नंतर

नेहमीच काही नवे लिहावे सुचल्यानंतर नेहमीच कसे नवे सुचावे तू नसल्यानंतर, काही भावना, काही वेदना अक्षय असती नेहमीच कसे मन मारावे तू दिसल्यानंतर. पुन्हा पुन्हा घोळत राहतात शब्द वेंधळे कसे रुसावे आयुष्यावर तू, स्मरल्यानंतर. नजर,स्मित आणि तुझ्या अदांवर सांग कितीदा किती लिहावे तू भेटल्यानंतर. तुझ्या रंगात रंगून गेले आयुष्य सारे सांग कसे ते रंग उतरावे तू गेल्यानंतर. प्रथमच लिहीली अशी कविता तुझ्यासाठी मिळेल का अभय सांग तू, वाचल्यानंतर. ---- अभय बापट १२/०५/२०२३

जगणे राहून गेले

सगळे बोललो तरी बोलणे राहून गेले श्वासामधून सुगंधाचे देणे राहून गेले. किती चाललो एकमेकांच्या सोबतीने हातामध्ये हात आपले घेणे राहून गेले. रचले इमले कितादा स्वप्नातल्या गावातले विश्वासाचे धागे तरीही गुंफणे राहून गेले. अनुभवले जागूनी चांदण्याचे सोहळे ओंजळीत चांदणे ते भरणे राहून गेले. आले सुख उशाशी रातराणीच्या पावलांनी रात्रीपाठी नव्या दिसाला जागणे राहून गेले. -----अभय बापट ०२/०३/२०२३

तुझ्यामुळे

तुझ्यामुळे तर उमटली सारी सोनपावले तुझ्यामुळे या आयुष्यात वसंत फुलला. ----अभय बापट ०२/०५/२०२३

गोडवा तिळाचा

ओठावरती तीळ गालावर खळी आहे गोडी अमृताची त्यापुढे अधुरी आहे. गोडवा आहे मुळातच बोलण्यात तुझ्या कितीही बोललो तरी ही भेट अपुरी आहे. बघितलेस तू खोलवर डोळ्यात जेव्हा तेव्हाच समजले माझ्या स्वप्नांना मंजूरी आहे. घडली जेव्हा नजरभेट पहाटेला जागताना यौवनाने मुसमुसलेली तू लाघवी सूरी आहे. कोणासाठी अप्सरा कोणासाठी परी आहे माझ्यासाठी तू आपली गृहिणीच बरी आहे. ------ अभय बापट १४/०१/२०२३

आवरणे

चंबूगबाळ आवरावं म्हणतो  माणसांंना विसारावं म्हणतो सावरणाऱ्या पुस्तकांंना समर्थ हाती सोपवावं म्हणतो. थोडसं झुकावं म्हणतो ओझ उतरावं म्हणतो आपुलकीच्या धाग्यांंना निगुतीने सोडवावं म्हणतो. स्वप्न सोडावं म्हणतो रस्ता बदलावा म्हणतो शेवटच्या मार्गावर एकट्याने चालावं म्हणतो. आठवणीतल्या शब्दांना आतातरी जागावं म्हणतो, पुस्तकातल्या गोष्टींमधलं जग बघावं म्हणतो. कोणजाणे कसा असेल खडतर मार्ग काळोखाचा उजेडासाठी एकट्याने एकटंच जळावं म्हणतो. सोप्पं नसतं बोलण्याइतकं वागणं जगावेगळं संपण्यापूर्वी पुन्हा एकदा नव्याने तेवावं म्हणतो. शब्दांनी जोडावं म्हणतो मार्दव्यानं वागावं म्हणतो, मराठी बाणा सोडून माणसासारखं जगावं म्हणतो ----अभय बापट २५/०४/२०२३

नेहमीच...

नेहमीच काही नवे लिहावे सुचल्यानंतर नेहमीच कसे नवे सुचावे तू नसल्यानंतर, काही भावना, काही वेदना अक्षय असती नेहमीच कसे मन मारावे तू दिसल्यानंतर. पुन्हा पुन्हा घोळत राहतात शब्द वेंधळे कसे रुसावे आयुष्यावर तू स्मरल्यानंतर. ---अभय बापट

गंध

आठवतंय तुला, तुझ्या घरुन बाहेर पडताना,जिन्यात तू बोलण्यासाठी वळलीस,तुझ्या केसांचा मऊ,मुलायम,नाजूक स्पर्श माझ्या गालावर रेंगाळून गेला.       मृदगंध हा माझा सर्वात जास्त आवडणारा गंध पण त्या क्षणी तुझ्या केसांच्या सुगंधाने क्षण भारुन टाकला तो आजपर्यंत मनात भरुन राहीलाय.        हा सुगंध आयुष्यभरासाठी जपण्याची धडपड चालू असतानाच हात सुटून गेला कायमसाठी.       पाऊस येतो नव्याने दरवर्षी, मृदगंधाला घेवून येतो, पण तू ? एका वळवाच्या पावसाने कायमचा दुरावलीस, पाऊस जसा दुरावतो आणि जमीनीला शुष्क,ओसाड बनवून जातो तशीच,तुही वैराण वाळवंट बनवून गेलीस. जणू ते ओघळलेले अश्रू शेवटची सही होती आपल्या नात्याच्या कागदावरची.        तू नाही पण त्या सुगंधाने मात्र वचन पाळले आहे साथ करण्याचे, त्या सुगंधाला अमरतत्वाचे वरदान मिळाले आहे जणू, मनाच्या कुपीत दरवरळत आहे,तो शेवटपर्यंत तसाच राहील.         शेवटपर्यंत........ ---- अभय बापट २८/०३/२०२३

व्यथा

माझ्या जन्माच्या प्राक्तनाला असे नको रे बांधूस, तुमच्या इवल्याशा सुखासाठी  घरटे नको तोडूस. घरटे तुझे माझे राहो वसुंधरेच्या खांद्यावर, तुझ्या सुखाचे चांदणे पडो माझ्या पिल्लांवर. फार नाही मागणे नको डावलू निसर्गाला, तोच देतेसे दाणा तुझ्या माझ्या भुकेला. तुझ्या बाळांची चिऊताई होवून मी राहीन, त्यांच्या बाळलीला पाहताना पिलांना दाणा भरवीन. चार दाणे भुकेसाठी आणि पाण्याची खापरी, कर विचार माणसा तुला म्हणतात विचारी. --- अभय बापट २१/०३/२०२३

त्याचे काय?

सावरतो रंग श्रीहरीचा माणसांना स्वमग्न माणसाला काय त्याचे. आजकाल गाय उपाशी येते घरी भुकेल्या वासराला काय त्याचे. खळ्यातच रुजून येते धान्य सारे वाट चुकल्या निसर्गाला काय त्याचे. उपाशी झोपतात गरीब कच्चीबच्ची समृद्धीच्या दलालाला काय त्याचे. मोकळा पसा काय वाटणार भुकेला पुस्तकी उपदेशाला काय त्याचे. ----- अभय बापट १०/०३/२०२३

विश्वास

अंतरामध्ये सदाचा  मधुमास पाहीजे, सोबतीला तुझा सदा  सहवास पाहीजे. मास बदलतात  नेमाने वर्षामधले तू आहेस सोबतीला  विश्वास पाहीजे. वसंत ऋतू देत असतो  भरभरुन फुले, आपल्या नात्यामध्ये तो  सुवास पाहीजे. केला आहे करार हा  अनंत काळाचा, अंतरात्म्याला भेटण्याचा  प्रवास पाहीजे. ------- अभय बापट. ११/०३/२०२३

होळी

आरसा ही गुदमरतो धुळवडीने मी पणाची रंगपंचमी रोज येते. ----- अभय बापट

प्रेमाची भाषा

भाषा साधी मिठीचीच होती ओठांतून त्याचे लिप्यंतर झाले. कळले सारे मौनातील इशारे डोळ्यांतून त्यांचे भाषांतर झाले. कधी उमलली कळी शब्दांतून ती ऋतू नसता फुलणे अवांतर झाले. सरले चार दिसाचे शब्दांचे सोहळे जणू मनाचे देहांतून देशांतर झाले. उमटले मनावर खोल ठसे व्यथांचे मनाशी भांडणे निरंतर झाले. विनाकरण ठाकले अंतर दोघांमध्ये का रस्ते आयुष्याचे समांतर झाले. --------- अभय बापट १३/०२/२०२३

माझी गझल

गझलेलाही शिर्षक द्यावे असे कधी वाटते शब्दाशब्दांतून अर्थ शोधावे असे कधी वाटते.   साधेपणाचे वरदान असते गझलेमध्ये सदा सौंदर्यालाही परिमाण द्यावे असे कधी वाटते. सर सर धावत येते श्रावणधारे सारखी गझलेमध्ये चिंब भिजावे असे कधी वाटते. असते वृत्ती वेगवेगळी तुमच्या माझ्यापासून मात्रे मात्रेने फुलवत न्यावे असे कधी वाटते. नशेसारखी भिनत जाते रक्तामध्ये आपल्या हात देवूनी उरी धरावे असे कधी वाटते. माया ममता प्रेम जिव्हाळा तिच्यात वसते आपुलकीने स्विकारावे असे कधी वाटते. माझी गझल आणि कविता आठवणींचे लेणे शब्द होवूनी तिच्या उरावे असे कधी वाटते. न बोलताही गारुड करते मनामनावरती गझलेसाठी शुभ चिंतावे असे कधी वाटते. ----- अभय बापट ११/०२/२०२३

नशीब

आमचं नशीब तिच्या होकारात अडलेलं स्वप्नही चांदण्यासाठी रात्रभर जागलेलं. नसेल नशीबी कदाचित अत्तराचा फाया सुगंधाचे वरदान मध्येच वाऱ्यामुळे थांबलेलं. डोळ्यांमधले पाणी ओसंडून वाहते तरी मन अजूनही तीच्या वाटेवर तहानलेलं. कशाला हवेत हे एका दिवसाचे सोहळे पुर्ण आयुष्यच तीच्या प्रेमात गुंतलेलं. माणसं येतात आणि जातात आयुष्यात निसर्गाचे चक्र कुठे कोणाला चुकलेलं. -----अभय बापट ०९/०२/२०२३

जगणे मनाप्रमाणे

थोडे मनाप्रमाणे वागून पाहीले मी ओंजळीतले मोती फोडून पाहिले मी. नाही भेटले सुखाचे सोबती कोणी इथे नात्यांतले सोने माझ्या जोखून पाहीले मी. गर्दी गारद्यांची एकटाच मीही पडलो सोबत्यात रामशास्त्री शोधून पाहिले मी. वारा सभोवताली भिरभिरुन गेला थोडे शब्द सुमनांना उधळून पाहिले मी. देशात लोकशाही, दिली होतीत ग्वाही शब्दांत लोकशाही लिहून पाहीले मी. नाही राम इथे, ना माणूसही मिळाला जेव्हा मनाप्रमाणे जगून पाहिले मी. इथे भय कशाचे कायद्याची दुहाई जोडून हात 'अभय' मागून पाहिले मी. ---- अभय बापट २२/०१/२०२३
नात्यास नाव आपल्या देवू नकोस काही स्वप्नातले गाव इतके व्यापू नकोस बाई. सुगंध वाऱ्यावरती पोचला कधीचा श्वासास दोष इतका देवू नकोस बाई. वाटेल जगावेगळे वागणे जेव्हा माझे विचारात खोड तेव्हा काढू नकोस बाई. मिसळून रंग तुझा मी रंगलो कधीचा विसरुन स्वप्न कोवळे जावू नकोस बाई. ---- अभय बापट २०/०१/२०२३

वाट देवळाची

कळसाकडे बघताबघता पायरी चुकली नेमकी तीच पायरी होती माणूसकीची. देवळाची पायरीही चौकटीनी वेढलेली पुर्वग्रहाची जळमटे दारात टांगलेली. ---अभय बापट ०९/०१/२०२३

दिवास्वप्न

तुझे शब्द काल भलतेच ओथंबलेले कदाचित काल पाऊस बरसून गेला. माझ्या ही मनाला आलेली तरारी एक शब्द माझ्याही मनात रुजून गेला. नको दिवास्वप्ने पुन्हा ती नव्याने तुझ्या चांदण्याने उन्हाळा निमून गेला. तुझा भाव वेडा वेल्हाळ थोडा मनावर पुन्हा कोडे गोंदवून गेला. नको गुढगर्भी ते गुज अंतरीचे जो भाव कधीचाच सुकून गेला. ---- अभय बापट ०८/०१/२०२३

प्रार्थना

पुन्हा एकदा सौंदर्यच विश्वात उरावे पुन्हा एकदा ॐकाराने आसमंत भरावे पुन्हा एकदा व्हावी सृजनाची रम्य पहाट पुन्हा एकदा माणुसकीने जन्मा यावे. पुन्हा एकदा वात्सल्य होवू दे साकार पुन्हा एकदा प्रेमाची वाहू दे संततधार पुन्हा एकदा माणसांनी गजबजू दे घरदार पुन्हा एकदा समाधानाचा उठू दे हुंकार. पुन्हा एकदा निसर्गाशी जळू दे नाळ पुन्हा एकदा संस्कृतीचा घुमू दे टाळ पुन्हा एकदा सामर्थ्याची जागू दे जाणीव पुन्हा एकदा मुठीमध्ये भरु दे आभाळ. पुन्हा एकदा स्वातंत्र्याची ओढ रुजावी पुन्हा एकदा स्वत्वाची जाणीव जागी व्हावी. पुन्हा एकदा मागावे ज्ञानेशाचे पसायदान. पुन्हा एकदा नव्याने आयुष्याची सुरुवात व्हावी. ----- अभय बापट ३०/१२/२०२२
तुझ्या डोळ्यातही मीच मला दिसतो  माझ्या अस्तित्वाला गहरा अर्थ मिळतो. किती सांग वाचू मी भाव तुझ्या मनातले तुझ्या अंतरंगातही माझ्याच रंग दिसतो. राधा आणि शाम कधी वेगवेगळा असतो ? कृष्णाचा सूर सदा राधेच्या ओठांवर सजतो. ------ अभय बापट ०६/०१/२०२३